मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
डोंबिवलीतील शिळफाटा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका उच्चभ्रू सोसायटीत एका तरुणीसह दोन तरुणांकडून नको तोच व्यवसाय सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड मारली असता, पोलिसांना फ्लॅटमध्ये दोन किलो ग्रॅम वजनाचे मेफोड्रेन अर्थात एमडी पावडर आढळली आहे. नशेखोरी साठी वापरल्या जाणाऱ्या या अमली पदार्थाची बाजारातील किंमत दोन कोटीहून अधिक आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात एका 21 वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे. या गुन्ह्यातील सहभागी महिला एमडी पावडर विक्रीसाठी या दोन आरोपींना मदत करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोणी पलावा वसाहतीमधील डाऊन टाऊन सोसायटीत दोन तरुण आणि एक महिला अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला पोलिसांनी गुप्त पद्धतीने या सोसायटीवर पाळत ठेवली. यानंतर पोलिसांना या परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. यानंतर गुरूवारी रात्री अकरा वाजता पोलिसांनी खोणी पलावातील डाऊन टाऊन भागात संबंधित फ्लॅटमध्ये छापा टाकला. त्यावेळी तेथे तीन जण आढळून आले. यातील एकाकडून पोलिसांनी दोन किलो वजनाचे मेफोड्रेन जप्त केले. दरम्यान दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना रात्रीच बेड्या ठोकल्या. या रॅकेटमध्ये इतरही काही जणांचा समावेश असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
