Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी असा वाद उफाळला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवावी, असा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 5 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे गिरगाव येथून मोठा मोर्चा काढणार आहेत.

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी हिंदीला विरोध करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे या मोर्चात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राजकारणातील मोठी अपडेट समोर आली आहे. मनसेच्या एका बॅनरवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो झळकला आहे.

या बॅनरमधून मनसेन अजित पवारांना राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. हिंदी भाषा सक्तीकरणाच्या विरोधात अजित पवार यांनी प्रसार माध्यमांपुढे मांडलेल्या मत फोटोसह मनसेच्या बॅनरवर छापण्यात आलं आहे. हा बॅनर मनसेचे मुंबई शहरचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लावलं आहे. यावर आता अजित पवार काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बॅनरमध्ये अजित पवारांची प्रतिक्रिया छापली आहे. ज्यात ते हिंदी सक्तीकरणाचा विरोध करताना दिसत आहेत. ”इयत्ता पाचवी पर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं. इतर कोणत्याही भाषा शिकू नये. कोणत्याही भाषेला विरोध नाही. पण लहान वयात मुलांवर तीन भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. हीच प्रतिक्रिया मनसेनं आपल्या बॅनरवर छापली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सुद्धा अजित पवार यांना आणि त्यांच्या पक्षाला आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.