मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा 42 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. काल (28) रात्री अचानक तिची तब्येत बिघडली. त्यानंतर तिला अंधेरीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी शेफाली जरीवालाला मृत घोषित केलं. बिग बॉस आणि काँटा लगा या गाण्यानं शेफालीला प्रसिद्धी मिळवून दिली होती.
शेफाली जरीवालाचा पार्थिव आता कूपर रूग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलं आहे. तिचे कुटुंबीय सध्या कूपर रुग्णालयात दाखल झालेत. तिचा मृत्यूचं नेमकं असं कारण समोर आलेलं नाही. सकाळी फॉरेन्सिक विभागाच्या टीमनं तिच्या घरी तपास केला. त्यानंतर तिचा पती पराग त्यागीसह चार जणांना जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
काल घरी झाली होती सत्यनारायणाची पूजा-
शेफालीच्या घरी काल (27 जून) सत्यनारायणाची पूजा होती. त्यानंतर काल संध्याकाळी शेफाली झोपेतून उठली तेव्हा तिचा रक्तदाब कमी झाला होता. यानंतर तिची तब्येत बिघडू लागली. तब्येत खालावल्याने शेफालीने सलाईन घेतले, परंतु यानंतरही तिची प्रकृती बिघडू लागली. काहीवेळाने अचानक शेफालीचा रक्तदाब वाढला. त्यानंतर घरून शेफालीच्या पालकांना फोन करण्यात आला आणि त्यांनी सांगितले की, शेफाली बेशुद्ध पडली आहे. यानंतर शेफालीला बेली व्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले.
कोण आहे शेफाली जरीवाला?
शेफाली जरीवाला हिचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला होता. शेफाली जरीवाला अनेक रिॲलिटी शोज, चित्रपट, गाण्यांचे अल्बममध्ये दिसून आली होती. नच बलिए 5 आणि नच बलिए 7 मध्येही शेफाली जरीवालाने सहभाग घेतला होता. 2019 मध्ये बिग बॉस 13 मध्येही स्पर्धेक म्हणून शेफाली दिसली होती.
काँटा लगा या गाण्यानं शेफालीला मिळाली प्रसिद्धी-
2002 मध्ये ‘काँटा लगा’ या अल्बममधील गाणे रिलीज झाले आणि ते रिलीज होताच सर्वांच्या पसंतीस उतरले. या गाण्यात शेफाली जरीवालाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता. या गाण्यामुळे शेफाली जरीवालाला चांगली प्रसिद्धी देखील मिळाली होती. 1964 सालच्या समझौता या सिनेमातील प्रसिद्ध गाणे कांटा लगाचे हे रीक्रएटेड व्हर्जन होते. हे गाणे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायले होते. तर कल्याणजी-आनंदजी यांनी संगितबद्ध केले होते.
