Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

 ‘काँटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी शेफाली जरीवाला टीव्ही इंडस्ट्रीतील एक चमकता चेहरा होती. शेफाली आता या जगात नाहीये. तिच्या अचानक जाण्याच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अजून समोर आलेलं नाहीये.  दरम्यान, शेफालीच्या आयुष्यातील अनेक जुने पैलू पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यातला एक म्हणजे तिचा पहिला विवाह आणि घटस्फोटाचा काळ. याबद्दल तिने स्वत:  खुलासे केले होते.

शेफालीचं वैयक्तिक आयुष्य

शेफालीचा पहिलं लग्न 2004 मध्ये म्युझिक डायरेक्टर हरमीत सिंग (मीत ब्रदर्स) याच्याशी झाला होता. मात्र, 2009 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्या नात्यात शेफालीला शारीरिक नाही तर, मानसिक हिंसेचा सामना करावा लागत होता. एका जुन्या मुलाखतीत तिनं स्पष्टपणे सांगितलं होतं की, ”जेव्हा एखाद्या नात्यात तुमचं आदराने स्वागत होत नाही, तेव्हा खूप त्रास होतो. हिंसा ही फक्त शरीरावर होणारी नसते, ती मानसिकही असते. आणि जेव्हा आयुष्य सहन करण्याची लिमिट पार करतं, तेव्हा निर्णय घ्यावाच लागतो.”

स्वत:वर विश्वास होता, म्हणून…

शेफाली पुढे म्हणाली होती की, ”असे निर्णय घेणं सोपं नसतं. पण मी आर्थिकदृष्ट्‌‍या स्वतंत्र होते, म्हणून मी तो निर्णय घेऊ शकले. आपल्याकडे घटस्फोटाकडे नेहमीच वाईट नजरेनं पाहिलं जातं, पण मी समाजाचं ऐकलं नाही. माझ्या कुटुंबानं मला कायम हेच शिकवलं की, समाज काय म्हणेल याचा विचार न करता स्वत:साठी योग्य निर्णय घ्यावा आणि मी तेच केलं.”

दुसरं प्रेम, दुसरी संधी

हरमीतसिंगपासून विभक्त झाल्यानंतर शेफालीने आयुष्यात एकटेपणा आणि तणाव  अनुभवला. पण काही वर्षांनी तिची ओळख अभिनेता पराग त्यागी यांच्याशी झाली. मैत्रीच्या सुरुवातीनंतर दोघांचं नातं प्रेमात बदललं आणि 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं. शेफाली आणि पराग यांचं नातं अनेकांसाठी प्रेरणादायक ठरलं. दु:खातून मार्ग काढत, स्वत:ला सावरत, तिनं आयुष्याला दुसरी संधी दिली.