मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
”तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये मोदी सरकारने दिले. तुझ्या बापाच्या पायातील चप्पल याच सरकारमुळे आहे,” असे बेताल वक्तव्य भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केल्यामुळे सध्या ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर टीका होत असून, आमदार लोणीकर यांचा निषेध केला जातोय. दुसरीकडे शक्तिपीठ महामार्ग सध्या चर्चेत असून, या महामार्गाला विविध जिल्ह्यांतील नागरिकांचा विरोध दिसून येत आहे. यासोबतच बुधवारी आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याने संविधान हत्या दिवस साजरा करण्यात आलाय. या सगळ्या विषयांवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी सरकारवर टीकेचा निशाणा साधला आहे.
मोदी यांच्यामुळेच त्यांचा जन्म झाला : आमदार बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मोदी यांच्यामुळेच त्यांचा जन्म झाला असेल आणि सगळ्या गोष्टी मिळत असतील, तर हा एकंदरीत निवडून दिलेल्या सरकारचासुद्धा एक अपमान आहे. खरं म्हणजे या महाशयांनी पहलगाममध्ये आमच्या भगिनीचे कुंकू पुसले ते मोदी यांच्यामुळेच पुसले. ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली. तीही मोदी यांच्यामुळे. मुंबईतील मोक्याचे भूखंड मराठी माणसाच्या घशातून काढून अदानीला दिले जात आहेत. तेही मोदी यांच्यामुळे. काल आपण पाहिले असेल शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांच्या जमिनी हिसकावून काढत आहेत. बऱ्याच गोष्टी घडत आहेत. राज्याची जनता स्वाभिमानी आहे. हे जर बबनराव लोणीकर यांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत. हे या महाराष्ट्राने समजून घेतले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
ठेकेदारांच्या माध्यमातून नेत्यांना मदत होणार : शक्तिपीठ महामार्गाबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ”हा देशावर भार आहे. अशा राजकीय प्रकल्पांमुळे ठेकेदारांना फक्त मदत होईल. ठेकेदारांच्या माध्यमातून नेत्यांना मदत होईल. अशा राजकीय प्रकल्पाला अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे. काल वीस हजार कोटी मंजूर केले. त्यातले दहा हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी वळवले जाणार आहे. लोकसभेत हेच झाले. हे प्रकल्प ठेकेदारांसाठी काढले जातात. ठेकेदारांना कामाचे शब्द दिलेले आहे. आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे? ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे. हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्राचे ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल. ते म्हणजे अदानीला हाकलून देणे. सगळे अदानीला दिले जात आहे,” असंही संजय राऊत म्हणालेत.
आणीबाणीला बाळासाहेबांचा देशाला शिस्त लागावी म्हणून पाठिंबा : आणीबाणीबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ”एकनाथ शिंदे तेव्हा गोधडीमध्ये रंगत होते. आम्ही तेव्हा कॉलेज जीवनात होतो. बाळासाहेब यांच्याकडून आम्ही काही गोष्टी ऐकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब यांचे नाव घेणे थांबवले पाहिजे. त्यांनी मोदी मंत्र जपले पाहिजे. आणीबाणीला बाळासाहेब यांनी देशाला शिस्त लागावी म्हणून पाठिंबा दिला. आणीबाणीमध्ये 20 कलमांना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांचा क्लास घ्यायला मी तयार आहे. परकीय शक्तींच्या मदतीने काही लोक कारभार करत होते. त्याच लोकांसोबत आज एकनाथ शिंदे आहेत,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय.
