Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

एकीकडे, 24 जून 2025 रोजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 5 शतके झळकावूनही, टीम इंडियाला 5 विकेट्सने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसरीकडे, आयुष महात्रेच्या नेतृत्वाखालील ज्युनियर संघाने म्हणजेच भारताच्या 19 वर्षांखालील संघाने इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाला 231 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. कर्णधार आयुष म्हात्रे आणि आयपीएल स्टार 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी सपशेल फेल ठरले, तर हरवंश पंगालियाचे नाबाद शतक तसेच राहुल, कनिष्क आणि अंबरीश यांच्या अर्धशतकी खेळीने भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

भारताच्या 19 वर्षांखालील संघ आणि इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघ यांच्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे, ज्यातील पहिला सामना मंगळवारी खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी बाद 442 धावांचा मोठा स्कोअर केला आणि प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 41.1 षटकांत 211 धावांवर आटोपला आणि 231 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

भारताकडून कर्णधार आयुष महात्रे आणि वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली, परंतु आयुष एक रन करून आऊट झाला, तर वैभव 13 चेंडूत एक षटकार आणि 2 चौकारांसह 17 धावा काढून आऊट झाला. भारताने 91 धावांत 5 विकेट गमावल्या, पण त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी धमाका केला. ज्यामध्ये राहुल कुमारने 60 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह 73 धावांची खेळी खेळली, तर कनिष्क चौहानने 67 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 79 धावांची खेळी खेळली.

अंबरीशनेही आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले आणि 47 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 72 धावा केल्या. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरवंशने चमत्कार केला आणि 52 चेंडूत 9 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 103 धावा केल्या. शेवटच्या क्षणी खेळलेल्या हरवंशच्या या खेळीने भारताला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

यानंतर इंग्लंडचा कर्णधार विल बेनिसनने इंग्लंड संघासाठी 103 धावांची शतकी खेळी खेळली, परंतु तो संघाचा पराभव रोखू शकला नाही. भारताकडून दीपेश देवेंद्रने सर्वाधिक 3 विकेट घेतले.