आता नड्डा म्हणतात, ”काँग्रेसमध्ये अजूनही आणीबाणीसारखी हुकूमशाही मानसिकता”
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
देशात आणीबाणी लागू झाल्यास आज 50 वर्ष पूर्ण झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अनेक भाजप नेत्यांनी बुधवारी काँग्रेसवर तीव्र हल्ला चढवला आणि त्या काळाला भारतीय लोकशाहीचा सर्वात काळा अध्याय म्हटलंय. या दिवसाची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने संविधानाच्या मूलभूत मूल्यांना चिरडून टाकले.’हा दिवस त्या काळ्या अध्यायाची आठवण करून देतो जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रेस स्वातंत्र्य आणि नागरी हक्क हिरावून घेण्यात आले होते. हजारो राजकीय कार्यकर्ते, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. काँग्रेसने लोकशाहीला कैद केले होते. त्या हुकूमशाहीविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलाम केला.
काँग्रेसचा हेतू अजूनही हुकूमशाही पद्धतीचा : दुसरीकडे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादल्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनीही काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागलंय. काँग्रेसचा हेतू अजूनही हुकूमशाही पद्धतीचा आहे आणि विरोधकांचे क्रूर दमन करणे, धार्मिक तुष्टीकरण आणि सत्तेचा अहंकार काँग्रेसशासित राज्यांमध्ये उघडपणे दिसून येत असल्याचंही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी अधोरेखित केलंय.
देशाच्या संविधानाची हत्या केली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज सकाळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ”25 जून 1975 च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘अंतर्गत अशांततेचे’ कारण देत भारतावर आणीबाणी लादली आणि देशाच्या संविधानाची हत्या केली. 50 वर्षांनंतरही काँग्रेस त्याच मानसिकतेने चालत आहे, तिचा हेतू अजूनही त्याच हुकूमशाही पद्धतीचा आहे.” जेपी नड्डा पुढे म्हणाले की, ”1975 मध्ये न्यायालयाने इंदिरा गांधी यांना निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्यांना 6 वर्षांसाठी कोणत्याही निवडून आलेल्या पदावर राहण्यास अपात्र ठरवले. एका रात्रीत प्रेसचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, संपूर्ण विरोधी पक्षाला तुरुंगात टाकण्यात आले, प्रेसचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले, कलम 352 चा गैरवापर करून लोकशाही पायदळी तुडवण्यात आली. संसद आणि न्यायव्यवस्था लकवाग्रस्त झाली आणि 26 जून रोजी सकाळी काँग्रेसच्या हुकूमशाही सरकारने देशावर आणीबाणी लादली.”
संविधान चिरडले गेले : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा म्हणाले की, काँग्रेसशासित राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आजही आणीबाणीच्या काळात होती तशीच आहे. विरोधकांचे दमन करणे, धार्मिक तुष्टीकरण आणि सत्तेचा अहंकार उघडपणे दिसून येतोय. भाजपाच्या एक्स अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, ”जेव्हा सत्ता ढासळली, संविधान चिरडले गेले, स्वत:च्या भविष्यासाठी संपूर्ण देशाच्या वर्तमानाला ओलीस ठेवले गेले. लोकशाहीची हत्या करण्यात आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तुरुंगात टाकण्यात आले आणि देशावर हुकूमशाहीचा अंधार लादण्यात आला. 25 जून 1975 तो काळा दिवस जेव्हा आहे ‘मी’ चा अहंकार हा ‘आपण’ च्या स्वातंत्र्यावर मात करत होता. भारत हे नेहमीच लक्षात ठेवेल.”
