सिरमौर / महान कार्य वृत्तसेवा
हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाला 24 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इयत्ता आठवी ते दहावीमधील विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सदर शिक्षकाची लिखिती तक्रार केली होती. त्यानंतर मुख्याध्यापकांनी या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. विद्यार्थिनी व मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या विद्यार्थिनींनी शुक्रवारी (20 जून) शाळेच्या मुख्याध्यापकांकडे लिखित तक्रार केली होती. यामध्ये विद्यार्थिनींनी म्हटलं होतं की सदर शिक्षक त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात. मुख्याध्यापकांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर या विद्यार्थिनींच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आलं. या बैठकीवेळी शाळेच्या लक्षात आलं की विद्यार्थिनींना होणाऱ्या त्रासाबद्दल, त्यांच्या लैंगिक छळाबद्दल बहुसंख्य पालक अनभिज्ञ आहेत.
या बैठकीनंतर शाळेने सदर शिक्षकाची पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. या शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 75 (लैंगिक छळ) व लैंगिक गुन्ह्यांपासून लहान मुलांचं रक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
