मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुंबईतील गोरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून पतीने स्वत:च्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दारूचे व्यसन आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये उध्वस्त झालेली नाती, बिघडलेली जीवनव्यवस्था याचे हे आणखी एक भयावह घटना समोर आली. ही धक्कादायक घटना गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग नगर नंबर 2 मध्ये सोमवारी रात्री घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या.
आरोपीचे नाव वसीम रफिक शेख (25) असून त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो अनेक दिवसांपासून दारूच्या नशेत पत्नीशी सतत भांडत होता. सोमवारी रात्री त्याने पत्नीला दारूसाठी पैसे मागितले, मात्र तिने नकार दिला. या नकारामुळे संतप्त झालेल्या वसीमने रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून तिचा जीव घेतला.
हत्या केल्यानंतर वसीम घरातून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र बांगुरनगर पोलिसांनी अतिशय तत्परतेने कारवाई करत अवघ्या दोन तासांत त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले. न्यायलयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या आरोपी वसीम शेख बांगुरनगर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे गोरेगाव परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी हत्येची संपूर्ण पार्श्वभूमी, कौटुंबिक वाद यांचा तपास सुरू केला असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
