Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील 40 वर्षीय तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

आदिवासी भागात दुर्गावाडी इथल्या कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल या दोघांचे मृतदेह आढळले. पोलिसांना या घटनास्थळावरून सुसाइड नोट सापडली असून आता या प्रकरणी काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि जुन्नरमधील महाविद्यालयीन तरुणी रूपाली संतोष खुटाण अशी मृतांची नावे आहेत. ही तरुणी रामचंद्र पारधी यांच्या नात्यामधील असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही मागील काही दिवसांपासून बेपत्ता होते. या दोघांच्या घरातील मंडळींनी पोलिसात तक्रार दिली होती. तरुणीच्या घरातील लोकांनी तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तर, रामचंद्र यांची गाडी तीन-चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे, तसेच तिथंच पायातील चपला जोड आढळून आल्याने काहीतरी विपरीत घडल्याचे समोर आले.

जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या 16 जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले. यात मुलीचा मृतदेह बाराशे फुटांवर आढळून आला. तर रामचंद्र यांचा मृतदेह तेराशे पन्नास फुटांवर आढळला. जवळपास दोन दिवस रेस्क्यू टीमचे शोध कार्य सुरू होते.

रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधीच सुसाइड नोट लिहिली होती. पोलिसांनी या घटनास्थळावरून या दोन्ही सुसाइड नोट जप्त केले आहेत.

तलाठी रामचंद्र पारधी यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये आई-वडील व भावाची माफी मागितली. तर, पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा, असे रामचंद्र पारधी यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.

तर, रुपाली खुटाण हिने सुद्धा आपल्या आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. या दोघांनी कुटुंबियांवर गंभीर आरोप करत एकत्रित आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. आता या दोघांच्या सुसाइड नोटवरच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहे.