Spread the love

तेहरान / महान कार्य वृत्तसेवा

इराण आणि इस्त्रायल यांच्यात मागील 12 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धानंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचा दावा आहे. मात्र युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही इराणकडून सतत बॉम्बहल्ला केला जात आहे. इस्त्रायलच्या सुरक्षा विभागाने सांगितलं आहे की, इराणने एका तासाच्या आत तीन वेळा मिसाईल हल्ला केला आहे, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तेल अवीवमध्ये सतत सायरन वाजत असून, लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत. अशा परिस्थितीत खरंच शस्त्रसंधी झाली आहे का? अशी विचारणा होत आहे.

‘अखेरच्या क्षणापर्यंत हल्ला करणार’

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ताज्या हल्ल्‌‍याबद्दल बोलताना सांगितलं की, आमचं शक्तिशाली लष्कर अखेरच्या मिनिटापर्यंत इस्त्रायलला त्याच्या हल्ल्‌‍याची शिक्षा देईल. ते म्हणाले की, ”सर्व इराणी नागरिकांसह मी आपल्या शूर सशस्त्र दलांचे आभार मानतो जे आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशाची सुरक्षा करण्यास तयार असतात, ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूला उत्तर दिलं”. दरम्यान इराणने शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा हल्ला केला असल्याने युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

13 जूनपासून सुरू झालेल्या इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेने त्यांच्या तीन प्रमुख अणुकेंद्र फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला आहे. इस्रायली हल्ल्‌‍यात इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख हुसेन सलामी यांच्यासह अनेक उच्च लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, इराणमध्ये सुमारे एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इराणच्या पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झालं आहे.

इराणला अन्य देशांकडून मदत नाही

अमेरिकेने युद्धात इस्त्रायलला मदत केली असून, इराणमधील सर्वात महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्र फोर्डोसह तीन ठिकाणी बॉम्बहल्ला केला, ज्यामध्ये अणुऊर्जा केंद्राचे बरेच नुकसान होण्याची भीती आहे. दुसरीकडे, इराणला मध्यपूर्वेतील कोणत्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही आणि त्यांना एकट्याने लढाई लढावी लागली. रशिया आणि चीनसारख्या शक्तिशाली देशांनी इराणला नैतिक पाठिंबा दिला पण अमेरिका-इस्रायलविरुद्धच्या युद्धात उघडपणे पाठीशी उभे राहिले नाहीत.