इचलकरंजी येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे या गर्भवती महिलेने धर्मांतरणाला कडाडुन विरोध करत हिंदू धर्मासाठी आपले बलिदान दिले. त्यामुळे तिला न्याय मिळण्यासाठी ‘शक्ती ऋतुजा’ या बॅनर खाली आपण सगळे एकत्र आलो असून राज्य सरकारने धर्मांतरण विरोधी आणि लव्ह विरोधी कायदा मंजुर करावा, अशी मागणी आमदार गोपिचंद पडळकर यांनी इचलकरंजी येथे केली. पंढरपुरच्या वारीबाबत आपमानास्पद वक्तव्य करणार्या अबु आझमी यांचा देखील त्यांनी कडक शब्दात समाचार घेतला. सरकारने या विरोधात त्वरीत पावलं उचलली नाहीत, तर आम्हाला मोठे आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
सांगली येथील ऋतुजा राजगे या गर्भवती महिलेने धर्मांतरणास विरोध करून आत्महत्या केली. तिला न्याय मिळावा आणि सरकारने कायदे करावेत या मागणीसाठी सोमवारी सकल समाजाच्यावतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवतिर्थ येथून गजानन महाजन (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्चात आमदार राहुल आवाडे, आमदार गोपिचंद पडळकर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉम्रेड मलाबादे चौकातून फिरून प्रांतकार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर आमदार गोपिचंद पडळकर यांनी मार्गदर्शन केले. ऋतुजा हिच्या मृत्यूची माहिती देतानाच छत्रपती संभाजी महाराजांनी देखील धर्मांतरणाला विरोध करत आपल्या जीवाची आहुती दिली, असा उल्लेख त्यांनी केला. गोरगरीब, सर्वसामान्य हिंदु बांधवांना फसवुण, काहीतर मदतीचे अमिष दाखवून आजही अनेक ठिकाणी धर्मांतरणाचे प्रकार सुरु आहेत. असे प्रकार करणार्यांना आपण ठोकून काढुया, असा इशाराही त्यांनी दिला.
लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु महिला भगिनींना फसवले जात आहे. त्या ठिकाणी आपण सजग राहिले पाहिजे, असे सांगतानाच विठ्ठुरायाच्या वारीबद्दल अक्षेपार्ह्य वक्तव्य करणार्या अबु आझमी यांचा समाचार येणार्या अधिवेशनात घेतल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हिंदु महिला भगिनींना फसवणार्यांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलावीत, अशी मागणी करताना पडळकर यांनी धर्मांतरण विरोधी कायद्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नावे द्यावीत अशीही मागणी त्यांनी केली.
ऋतुजाचा विवाह लावणार्या पादरीबरोबरच मध्यस्थी करणार्या कोल्हापुर महसुल खात्यात काम करणार्या कोळी नामक नायब तहसिलदारावरही कारवाईचीही मागणी त्यांनी केली. अनेक मुद्यांना हात घालत आपले झंजावती भाषण करून उपस्थितांना खिळवुन ठेवले. दरम्यान ५ महिलांनी प्रांताधिकारी दिपक शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शहर आणि परिसरातील हिंदु महिला बांधव, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर प्रांताधिकारी कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
