धाराशिव / महान कार्य वृत्तसेवा
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूरमध्ये काही दिवसांपूर्वी ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. या प्रकरणात तब्बल 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे रॅकेट राज्यभरात ड्रग्जचा पुरवठा करत होती. या प्रकरणी पोलिसांनी खोलात जावून तपास केला असता, यात अनेक राजकीय कनेक्शन समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत भाजपशी संबंधित पाच पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. आता या प्रकरणात आणखी मोठा मासा गळाला लागला आहे.
पोलिसांनी भाजपच्या माजी नगराध्यक्षाला सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधून अटक केली आहे. संतोष कदम परमेश्वर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो माजी नगराध्यक्ष आहे. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 22 जणांना अटक केली. यातील सहा आरोपी हे भाजपशी संबंधित आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी कुणाकुणाचं नाव समोर येणार? याबाबत सस्पेन्स वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री नऊ वाजता ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी भाजपचा माजी नगराध्यक्ष आरोपी विनोद ऊर्फ पिंटू गंगणे यास अटक केली होती. यानंतर पोलिसांनी अटकसत्र अधिक गतिमान केले. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भाजपच्या पाच पुर्ढायांचा समावेश होता. आता हा सहावा आरोपी देखील भाजपचाच असल्याने ड्रग्ज तस्करीतील राजकीय धागेदोरे समोर येत आहेत. आजही 16 जण फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अकलूज येथून रविवारी रात्री नऊ वाजता अटक केली. यानंतर त्यास पुढील तपासासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
