Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे विभक्त झालेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांमध्ये तीन भाषांचा फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसे व शिवसेनेने (उद्धव ठाकरे) त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्‌‍यावरून या दोन्ही मराठी भाषिक पक्षांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, मनसेचे कार्यकर्ते राज्यभरातील शाळांमधील मुख्याध्यापकांशी संपर्क साधून मुलांना हिंदी भाषा न शिकविण्याचे आवाहन करीत आहेत. काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषेतील पाठ्यपुस्तकांची होळी करून प्रतीकात्मक निषेध नोंदवला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटानेही राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केलं असून राज्यावर हिंदी लादण्याचा सरकारचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे. मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसे आणि शिवसेनेच्या (उद्धव गट) वतीने लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये महाराष्ट्रावर हिंदी लादली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीचे सरकार हे महाराष्ट्रद्वेषी आहे, अशी टीकाही त्यातून करण्यात आली आहे.

यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटानं ‘मोठा राजकीय बदल’ होण्याचे संकेतही दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हिंदीच्या मुद्द्‌‍यावरून स्पष्टीकरण दिलं आहे. ”आधी हिंदी भाषा अनिवार्य केली गेली होती, परंतु आता सुधारित शासन निर्णयानुसार ती सक्ती हटवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता तिसऱ्या भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

हिंदीवरून मनसे-ठाकरे गटाने सरकारला कसं लक्ष्य केलं?

    एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मनसेने लावलेल्या बॅनरमध्ये असं लिहिलंय की, परराज्यातून आलेल्यांवर मराठी लादण्याऐवजी मराठी माणसांवर हिंदी लादली जात आहे.

    याआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील शाळांमध्ये फक्त मराठी व इंग्रजी या भाषा शिकविण्याचे धोरण राबविण्याची विनंती केली होती.

    दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने लावलेल्या बॅनर्सवर लवकरच महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलतील, असा मजकूर छापण्यात आला आहे.

    महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल होऊन ठाकरे सरकार लवकरच परत येईल, असं ठाकरे गटानं शिवसेना भवनाबाहेर लावलेल्या बॅनर्समध्ये म्हटलं आहे.

    राज्यात सत्ताबदल होऊन पुन्हा ठाकरे सरकार येणार या शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरबाजीची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा रंगली आहे.

    या वादग्रस्त तीन भाषा धोरणाच्या विरोधात मनसे व ठाकरे गटानं सोशल मीडियावरूनही जोरदार आवाज उठवला आहे.