मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. अमेरिकेने रविवारी (22 जून) पहाटे इराणमधील तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ला करत इराणला कठोर इशारा दिला आहे. दरम्यान, इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्र डागून जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. पाठोपाठ कच्चे तेल व वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेल्या ‘होर्मुझ खाडी’ची (सामुद्रधुनी) नाकेबंदी करण्याच्या निर्णयाला इराणच्या कायदेमंडळाने मान्यता दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीवर सोपवण्यात आल्याचं वृत्त इराणच्या प्रेस टीव्हीने प्रसिद्ध केलं आहे. इराणने हा मार्ग बंद केला तर याचा भारतासह जगभरातील अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल.
अनेक तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की इराण इतकं टोकाचं पाऊल (होर्मुझ जलमार्ग बंद करणे) उचलणार नाही. मात्र, आता इराणने त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांना होर्मुझबद्दल विचारल्यावर ते म्हणाले ”इराणकडे विविध पर्याय उपलब्ध आहेत”.
भारतातील कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता
यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशनने म्हटलं आहे की अनेक आशियाई देशांमध्ये कच्चे तेल हे याच मार्गाने जातं. 2024 मध्ये 84 टक्के कच्चे तेल, 83 टक्के कंडेन्सेट (कंडेन्सेशन प्रक्रियेद्वारे वायू व वाफेचं द्रवात रुपांतर केलं जातं आणि त्याची आयात-निर्यात केली जाते) आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू हा याच होर्मुझ जलमार्गाने आशियाई देशांमध्ये पाठवण्यात आला आहे. चीन, भारत, जपान व दक्षिण कोरिया या देशांमध्ये आयात होणारं कच्चं तेल व नैसर्गिक वायू प्रामुख्याने या मार्गावर अवलंबून आहे. होर्मुझ जलमार्गाने निर्यात होणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी 69 तेल व कंडेन्सेट हे या चार देशांमध्ये जातं.
चीनचीही चिंता वाढली
होर्मुझ जलमार्ग बंद झाल्याने भारतावर मोठा परिणाम होईल. भारत कच्च्या तेलाच्या आयातीसाठी केवळ होर्मुझ जलमार्गावर अवलंबून नसला तरी भारतातील तेलाच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल. भारत हा रशिया, अमेरिका, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतून कच्चे तेल खरेदी करतो. त्यामुळे भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होणार नसला तरी या तेलाच्या किमती मात्र प्रभावित होऊ शकतात. भारताहून मोठा फटका चीनला बसण्याची शक्यता आहे. कारण चीन सर्वाधिक तेल इराणकडून आयात करतो. होर्मुझ जलमार्ग बंद झाल्यास किंवा जहाजांच्या प्रवासात अडथळे आल्यास बीजिंगचं मोठं आर्थिक नुकसान होईल. चीनमथील तेलाच्या किंमती भडकू शकतात.
