Spread the love

ठाणे / महान कार्य वृत्तसेवा

ठाणे जिल्ह्याच्या ऐरोली परिसरातील जुना चिंचपाडा परिसरात एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. आरोपीनं घरात घुसून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. निशा वाघेला (25) असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे. ती जुना चिंचपाडा परिसरात बहीण आणि भाचीसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी 20 जून रोजी सकाळी 6.30 वाजता घरात कुणी नसताना शेजाऱ्याने निशाला मारहाण केली. याबाबत रबाळे श्घ्ऊणब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, निशा वाघेला यांच्या घरात त्यांचा पाळीव श्वान आहे. घटनेच्या दिवशी शुक्रवारी पहाटे निशा वाघेला घरात लादी पुसत होत्या. यावेळी अचानक मनोज नावाचा इसम त्यांच्या घरासमोर आला. ”तुम्हारा कुत्ता मेरे घर के सामने गंदगी करता है, उसको संभालो नही तो तुमको मैं मार डालूंगा” असे बोलू लागला. त्यावेळी निशा यांनी ”तू असे का बोलत आहेस, हवं तर मी घाण साफ करते” असं सांगितलं आणि त्या घरात जाऊ लागल्या. यावेळी संतापलेल्या मनोजने पाठीमागून निशाच्या डोक्यात दगड मारला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने निशाला लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केली. मारहाण होताना निशाने आरडाओरडा केला असता मनोजने तिला उचलून घराबाहेर फेकून दिलं. आरडाओरडा ऐकून शेजारील लोक जमा झाले. यानंतर आरोपी मनोज घाबरून घटनास्थळावरून पसार झाला.

ही मारहाण होत असताना निशाची मोठी बहीण औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेली. बहिणीला मारहाण झाल्याचं समजताच तिने घराकडे धाव घेतली. यावेळी निशा जमिनीवर पडली होती, तिचे डोक्यातून रक्त येत होतं, अशी माहिती पीडितेची मोठी बहीण अंजु वाघेला (28) यांनी दिली. त्यानुसार रबाळे श्घ्ऊणब पोलीस स्टेशनमध्ये मनोज विरोधात गुन्हा नोंद केला. रबाळे श्घ्ऊणब पोलीसांकडून अधिक चौकशी सुरू असल्याचे समजते. मारहाण झालेल्या निशा वाघेला यांच्या डोक्याला व डोळयाला मोठी दुखापत झाली आहे. निशा यांना सुरुवातीला वाशी येथील पालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र इथं बेड शिल्लक नसल्याने त्यांना ऐरोलीमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. इथं उपचार सुरू आहेत. निशा वाघेला ही पुण्यात नर्स म्हणून काम करते. वाघेला कुटुंबीयांमध्ये कर्ताधर्ता पुरुष नसल्याने निशा वाघेला हिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे.