Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्रात एकीकडे राज ठाकरे – उद्धव ठाकरे युतीसंदर्भात चर्चा रंगल्या असतानाच एक मोठी घडामोड घडली होती. गुरुवारी मुंबईत राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे भाजपासोबत जाणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र त्याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे काही जाहीर करण्यात आलेलं नाही. यादरम्यान खासदार संजय राऊत यांनी या भेटीबद्दल आपल्याकडे इत्यंभूत माहिती असल्याचा दावा केला आहे. रोखठोकमधून त्यांनी यावर भाष्य केलं असून, फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते अशी टीका केली आहे.

रोखठोकमध्ये काय म्हटलं आहे?

”मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‌‍वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे हे गुरुवारी सकाळी वांर्द्याच्या ‘ताज’ हॉटेलात भेटले. दोघांत मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फीच असावी,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

”फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत. फडणवीस काळात मुंबईच्या सर्व जमिनी अदानी यांना दिल्या. मुंबईला भिकारी करून सर्व माल गुजरातला नेण्याचा हा डाव आहे काय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस भेटीत विचारला असावा अशी आशा आहे. मोदी व शहा यांना हवे तेच फडणवीस करणार व अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात. फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

”फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते. महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हटलं आहे की, ”मुंबई, महाराष्ट्र आणि देशात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राजकारणी अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात व पुन्हा राजकीय कामाला सुरुवात करतात. मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकारण मदाऱ्यांचा खेळ सुरु झाला आहे. मराठी माणूस मुंबईत संपवला जातोय याची कोणीही चर्चा करत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या चर्चेत आणि विचारात मराठी माणूस असण्याची शक्यता नाही. कारण त्यांनी मुंबई गौतम अदानी यांना आंदण दिली आहे”. राज्यकर्ते कोणीही असोत, सामान्य माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरतच आहेत व राजकारणी तेवढ्यापुरते अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात. मुंबईत चालत्या लोकलमधून 13 प्रवासी पडले. त्यातले चार जण मरण पावले. राजकारण्यांनी खोटे अश्रू ढाळले व पुन्हा राजकारण करायला मोकळे झाले. कश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात 26 मायभगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. बंगळुरूत एका क्रिकेट टीमचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक जमा झाले. त्या गर्दीत इतकी चेंगराचेंगरी झाली की, त्यात 11 लोकांना प्राण गमवावे लागले. मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला व त्यात नव्याने लोक बळी पडत आहेत. या भयंकर चित्राने 11 वर्षे राज्य करणारे मोदी जराही विचलित होत नाहीत. ते निर्विकार चेहऱ्याने सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत. फक्त कश्मीरातील पहलगाम येथील हल्ल्यातच नव्हे, तर बंगळुरू, मुंबई, मणिपुरातील घटनांतही मृत्यूच झाले व तेथेही कुणाचे तरी कुंकूच पुसले गेले, पण सरकारला त्याचे काय! सरकार राजकारण व त्यातून पैसा गोळा करण्यात गुंतले आहे. मुंबईपासून झारखंड, छत्तीसगढच्या जंगलापर्यंत सरकारचे लोक ठेकेदार, उद्योगपतींकडून पैसा जमा करीत आहेत असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.