पहाटे साडेतीन वाजता पोलीस घरात घुसले, गोळीबार केलेला नसतानाही एन्काउंटर केला; सोलापुरातील ‘त्या’ थरारक घटनेतील मृत सराईत शाहरुखची पत्नी अन् वडिलांचा आरोप
सोलापुर / महान कार्य वृत्तसेवा
पुणे शहर पोलिसांच्या (झ्ल्हा झ्दत्ग्म) गुन्हे शाखेने सोलापूरातील (एदत्रज्ल्ी) लांबोटी परिसरात शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (23) या सराईत गुन्हेगाराचा एन्काउंटर केला. त्याच्यावर पुणे पोलिसांच्या दप्तरी अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. गंभीर अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या कारवाईबाबत शाहरुख शेखच्या वडिलांनी आणि पत्नीने गंभीर आरोप केले आहे.
शाहरुखच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ”पहाटे साडेतीन वाजता 1012 पोलिस थेट घरात घुसले. शाहरुखने त्यांना आत न येण्यास सांगितलं, त्याच्याकडे पिस्तूल होतं, पण त्याने गोळीबार केला नाही. पोलिसांनी घरात शिरताच थेट चार गोळ्या झाडल्या”, असा दावा त्यांनी केलाय.
माझा मुलगा किरकोळ गुन्हेगार
शाहरुखच्या वडिलांनी दावा केला की, माझा मुलगा किरकोळ गुन्हेगार होता, इन्काउंटर करण्याइतका कुख्यात गुंड तो नव्हता. त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते. पण, बांबूने मारहाण झालेल्या प्रकरणात त्याच्यावर खोटा मोक्का लावण्यात आला. तो व्यवस्थित कामाला लागला होता. मात्र, पोलिसांनी त्याला आरोपी केले. पुण्याच्या काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शाहरुख उर्फ अट्टी शेखच्या वडिलांनी केली आहे.
शाहरुख शेखवर गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे
दरम्यान, शनिवारी रात्री पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. यामध्ये खुनाचा प्रयत्न, मारहाण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. तो त्या गुन्ह्यात फरार होता. शेख याच्यावर आर्म्स ॲक्टखाली जवळपास पाच गुन्हेही दाखल आहेत. पुणे क्राईम बँचच्या पथकाला शेख हा सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी येथे आपल्या नातेवाइकांकडे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीने शनिवारी रात्री संयुक्त कारवाई राबवली. पोलिसांना पाहताच शेखने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला. त्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेख गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहोळ पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
