शरद पवार गटात पुन्हा भूकंप? आमदारांची अस्वस्थता उफाळली, खासदारांची भूमिका काय?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी स्वत: अजित पवार गटासोबत जाण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. आमच्या पक्षातील काही लोक अजित पवार गटासोबत जाण्यास इच्छुक, पण पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रिया सुळेंना आहे, अशा आशयाचं वक्तव्य शरद पवारांनी केलं.
यानंतर आता शरद पवार गटाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सत्ता नसल्याने अस्वस्थ आहेत. ते सत्तेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. शरद पवार गटाने सत्तेत जावं, अशी आग्रही मागणी हे आमदार करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उच्चपदस्थ नेत्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पण शरद पवार भाजपसोबत जाण्यास तयार नाहीयेत. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार गटातील आमदारांना सत्तेचं वेध लागलं आहे. ते पक्षात अस्वस्थ आहेत. विरोधी पक्षात राहून मतदार संघातील कामे होत नाहीत. त्यामुळे सत्तेत जायला हवं, अशी आमदारांनी शरद पवारांकडे आग्रही मागणी केल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र भाजपसोबत युती करायची नाही, अशी शरद पवार यांनी ठाम भूमिका घेतली आहे. आमदारांना सत्तेचे वेध लागले असले तरी पक्षातील कार्यकर्ते आणि सर्व खासदार शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावा, उच्च पदस्थ सूत्रांनी केला आहे. दरम्यान, अलीकडेच सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांसोबत जाण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी कालमर्यादा नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. अशात आमदारांची अस्वस्थता उफाळून आल्याने शरद पवार गटात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
