Spread the love

नवरा सोडला, बॉयफ्रेंडसोबत गेली, अनैतिक संबंधाला विरोध करताच जन्मदात्याला संपवलं, भावालाही जबर मारहाण, मुंबई हादरली

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या वडिलांची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शंकर रामचंद्र कांबळे (58) असे मृत वडिलांचे नाव आहे. मुलीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणातून मुलीने प्रियकराच्या साथीने वडिलांचा काटा काढला आहे. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात  मुलगी सोनाली बैत (37)आणि तिचा प्रियकर महेश पांडे (27) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

नेमकं घडलं काय?

अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगी सोनाली बैत (37) हिचा 2008 मध्ये अमोल बैत या तरुणाशी लग्न झालं होतं .लग्नानंतर सोनालीला दोन मुलेही आहेत .पण 2022 पासून ती तिच्या पतीपासून वेगळी झाली .तिने प्रियकर महेश पांडे सोबत लिविंग रिलेशनशिपमध्ये  राहण्याचा निर्णय घेतला .ही बाब सोनालीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती .सोनालीच्या अनैतिक संबंधांना वडिलांचा प्रचंड विरोध होता .या कारणावरून बापलेकींमध्ये वारंवार वाद होत होते .

अनैतिक संबंधांवर आक्षेप घेताच…

एके दिवशी सोनालीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने तिने संतापाच्या भरात वडिलांवर तीन दिवसात दोन वेळा हल्ला केला .इतकेच नाही तर तिने भाऊ राहुल शंकर कांबळे (28) यालाही मारहाण करून जबर जखमी केले .भाऊ राहुलवर  स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

गेल्या आठवड्यात 8 जून रोजी शंकर कांबळे कामावर गेले असताना सोनालीचा प्रियकर महेश पांडे यांच्यासह ती तिथे पोहोचली .यावेळीही शंकर कांबळे आणि सोनाली मध्ये वाद झाला . या वादात संतापलेल्या प्रियकराने थेट सोनालीच्या वडिलांना चापट मारली .या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती .मात्र पोलिसांनी सोनाली आणि तिच्या प्रियकराला समज देऊन सोडून दिले होते .

सोनालीने प्रियकरासह वडिलांचा काटा काढला

पण वडिलांचा राग मनात ठेवून सोनालीने सगळ्या मर्यादा सोडून दिल्या होत्या .11 जून 2025 रोजी सायंकाळी सोनाली आणि महेश या दोघांनी अंधेरी कुर्ला रोडवरील एका हॉटेल बाहेर सोनालीच्या वडिलांना गाठलं .त्यांच्यावर हल्ला केला .यावेळी शंकर यांचा मुलगा राहुल याने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला .मात्र त्यालाही मारहाण करण्यात आली .सोनाली आणि तिच्या प्रियकराने केलेल्या हल्ल्यात शंकर कांबळे गंभीर जखमी झाले .जखमी अवस्थेतच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले .पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी घटनेनंतर पंचनामा करत सोनाली बैत आणि महेश पांडे या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत .