बारामती / महान कार्य वृत्तसेवा
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. वर्धापन दिनाच्या मूहुर्तावर दोन्ही गट एकत्र येण्याची घोषणा करतील, असेही बोलले जात होते. मात्र तसे झाले नाही. तत्पूर्वी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही याबाबत सूचक वक्तव्य केले होते. मात्र तशी घोषणा झाली नाही.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बारामतीतून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांनी युतीसाठी अजित पवारांना प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. पवारांनी थेट अजित पवारांकडे साकडं घातल्याचं बोललं जातंय. युतीचा हा प्रस्ताव स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर कोणत्याही निवडणुकीसाठी नाहीये. हा प्रस्ताव आहे, बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत…
शरद पवारांनी अजित पवारांकडे नेमकी काय मागणी केली?
येत्या काही दिवसांत बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. बारामती तालुक्यात ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. मागील अनेक वर्षांपासून या कारखान्यावर अजित पवारांचं निर्विवाद वर्चस्व दिसून आलं आहे. अशात आता या निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांनी अजित पवारांकडे युतीचा हात पुढे केला आहे. शरद पवार यांनी ‘प्रत्येक गटातून एक उमेदवारी द्यावी’, अशी मागणी अजित पवारांकडे केली आहे. पण तूर्तास सहा जागा सोडण्यासाठी अजित पवारांचा नकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता अजित पवार काकांच्या शब्दाला मान देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अजित पवार काय निर्णय घेणार?
खरंतर, मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्या सरकारबाबतची भूमिका काहीशी मवाळ झाली आहे. त्यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर आता पवारांनी अजित पवारांसमोर युतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एक मोठे पाऊल समजले जातेय. यावर अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
