पिंपरी चिंचवड / महान कार्य वृत्तसेवा
विवाह जमविण्याची कसरत करताना अनेकजण मॅट्रिमोनियल वेबसाईटचा वापर करतात. पण, या वेबसाईटचा वापर करताना अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यावर किती मोठे संकट येऊ शकते, याचं उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये दिसून आलं आहं.
विवाह इच्छुक महिला आणि पुरुषांचे परिचय उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईटवरून महिलेची सुमारे 3 कोटी 17 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून तीन आरोपींना दिल्ली इथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. रंजीत मुन्नालाल यादव (वय 27 वर्ष), सिकंदर मुन्ना खान (वय 21 वर्ष) आणि बबलू रघुवीर यादव (वय 25 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत.
तिन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या : गुन्ह्यातील आरोपींनी पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर आरोपींनी व्यवसायामध्ये तोटा झाल्याचं कारण देत तर कधी कच्चा माल घेण्यासाठी भांडवल लागत असल्याचं कारण देत महिलेकडून पैसे उकळले. तर कधी विमानतळावर अधिकाऱ्यांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचं कारण देत पीडित महिलेकडून एकूण 3 कोटी 16 लाख 78 हजार रुपये उकळले होते. पीडित महिलेकडून पैसे घेतल्यानंतर आरोपींनी ते पैसे जवळपास 300 ते 400 वेगवेगळ्या बँक खात्यात वळवले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली आहे. विविध बँकेमध्ये खाती उघडली : गुन्ह्यातील आरोपी हे पोलिसांपासून लपण्यासाठी इन्स्टाग्राम कॉलचा वापर करत होते. दाखल गुन्हयातील आरोपी यांनी बँक अंकाउट उघडण्यासाठी तात्पुरता भाडेकरार केला होता. त्याआधारे विविध बँकेमध्ये खाती उघडली होती. यातील आरोपी बबलु यादव हा मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या एटीएममधून पैसे काढून बाकीच्या आरोपीना देत होता. तसेच आरोपी रणजीत मुन्नालाल यादवनं त्याच्या पंजाब नॅशनल बँक अकाऊंटवर गुन्हयातील 36,96,672 रुपये घेतले असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी दिली. या प्रकरणात पुढील तपास सायबर गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड शहर पोलीस करत आहेत.
