इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (प्रविण पवार)
इचलकरंजी नगरपालिकेची डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपली होती त्यानंतर प्रशासकिय कार्यकाल सुरू आहे. मंगळवारी नगर विकास विभागाने प्रभाग रचनेचे आदेश काढल्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर इचलकरंजी महापालिकेचे पहिले सभागृह अस्तित्वात येत आहे. या महापालिकेच्या पहिल्या सभागृहामध्ये निवडून जाण्यासाठी अनेक इच्छुकांचे हालचालींना वेग आला आहे.
मंगळवारी नगर विकास विभागाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेबाबत आदेश जारी केले आहे. त्यानुसार एका प्रभागातून चार सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रभाग रचनेच्या कार्यपद्धतीमध्ये जनगणनेची लोकसंख्या, सदस्य संख्या, प्रभाग संख्या, प्रभागांची सरासरी लोकसंख्या, प्रभाग रचना करण्याची मार्गदर्शक तत्त्वे आदींचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर प्रभाग रचना करताना सरासरी लोकसंख्या, गुणोत्तर याचे पालन करावे लागणार आहे. प्रभाग रचना ही एकूण आठ टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यामध्ये प्रारुप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे त्यानंतर प्रारुप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविणे. सदर प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता घेणे. प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे, सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्तांकडे सादर करणे, सुनावणीनंतर प्राप्त अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे व सर्वात शेवटी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे अशा पद्धतीने प्रभाग रचना होणार आहे.
प्रभाग प्रभाग निश्चित करत असताना गुगल मॅप द्वारे प्रभाग रचना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे इचलकरंजी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून प्रभाग रचना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर व दिवाळीपूर्वी निवडणुका घेण्याचा मार्ग सध्या तरी मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून, अनेकांनी प्रभागांमध्ये संपर्क वाढवला असून गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
असे असणार पहिल्या महापालिकेचे सभागृह
सदस्य संख्या – ६५
एकूण प्रभाग – १६
१५ प्रभागामध्ये ४ सदस्य
१ प्रभागामध्ये ५ सदस्य
