शड्डू ठोकून प्रकाश महाजन म्हणाले, नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला!
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
पुन्हा आमच्या विरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा धमकीवजा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांना दिला. यानंतर प्रकाश महाजन चांगलेच आक्रमक झाले आहेत. प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंदोलनाला सुरुवात केली आहे. नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन करण्याचा निर्धार केला. मात्र त्यांच्या आंदोलनापूर्वीच महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाले होते. पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रकाश महाजन आंदोलनावर ठाम राहिले. प्रकाश महाजन क्रांती चौकात आंदोलन करण्यासाठी दाखल झाले.
नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला
यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, मी इथे त्यांची अर्धा तास वाट पाहणार आहे. मला पोलिसांनी अर्ध्या तासाची परवानगी दिली आहे. मी घराचा पत्ता सांगितलेला आहे. त्यांनी त्या घरापाशी यावे आणि त्यांना काय मारहाण करायची ती करावी. मी त्याच्या देखील पुढे जाऊन सांगतो की, मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती. मी सुद्धा जीवावर उदार झालो आहे. नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घालत आहात. मी प्रकाश महाजन आहे, असे खुले आव्हान त्यांनी नारायण राणे यांना दिले.
मी घाबरणार नाही
प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, कुठे येऊ सांगा. तुम्ही का धमक्या देताय? कार्यकर्त्यांना सांगून मला का फोनवर धमक्या देताय? मी इथे उभा आहे. सांगा तुम्ही मी कणकवलीत येतो. तुमच्या बंगल्यापर्यंत येतो. नारायण राणेंनी मला धमकी दिली आहे. त्यांच्या विरोधात मी शड्डू ठोकतोय. तुम्ही कार्यकर्त्याला अशा धमक्या देता की तुला उलट्या करायला लावीन. तुम्ही चुकीच्या माणसाशी हात घातला आहे. मी राज ठाकरेंचा सैनिक आहे. मी घाबरणार नाही. मी कधीच कोणावर सभ्यता सोडून टीका केलेली नाही. एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला इतका राग आला. कारण मी खरं बोललो. त्यामुळे त्यांना राग आला, असे त्यांनी म्हटले आहे.
