Spread the love

यड्राव / महान कार्य वृत्तसेवा

यड्राव (ता. शिरोळ) येथे ‘विकसित कृषी संकल्प अभियान 2025’ अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग, पशुपालन व दुग्ध व्यवसाय या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या मेळाव्यात डॉ.सत्यवान आगवले यांनी दुग्ध व्यवसाय व पशुपालन क्षेत्रातील संधींबाबत सखोल माहिती दिली. तर श्रीमती दीपाली मस्के यांनी सोयाबीनपासून दूध, पनीर व इतर विविध पदार्थ निर्मितीच्या प्रक्रिया तसेच उद्यमशिलतेच्या संधींबाबत माहिती दिली. प्र.मंडळ कृषी अधिकारी संपतराव मुळीक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री.सूर्यगंध यांनी जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

दरम्यान, सोयाबीन व ज्वारी पीक स्पर्धेत यश मिळवलेल्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा स्तरीय सोयाबीन पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक वैभव कोळी, तालुकास्तरावरील प्रथम क्रमांक प्रशांत निर्मळ व ज्वारी पीक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवलेले विजय माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच कुणालसिंग नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती सीमा खारकांडे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मंगला कांबळे, प्रगतशील शेतकरी आप्पासो पाटील, सौ.धनश्री बावडेकर, सौ.सारिका कुंभार, सौ.सरिता माने, अभिनंदन पाटील, ज्ञानेश्वर यादव, कल्लु पाटील, निरंजन कोळी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.