भोगावती / महान कार्य वृत्तसेवा
आपटाळ पैकी कुदळवाडी (ता. राधानगरी) येथे रविवारी सकाळी गव्याने केलेल्या हल्ल्यात ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी भिकाजी गुंडू बेरकळ (वय ५९) यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भिकाजी बेरकळ हे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कडका येथील पाण्याच्या ठिकाणी गावाला पाणी सोडण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या एका गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बेरकळ यांचा जागीच मृत्यू झाला.
राधानगरी तालुक्यातील आपटाळ पैकी कुदळवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका गरीब कामगारांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय स्तरावर मदत मिळावी अशी मागणी आपठाळ परिसरातून होत आहे.
