Spread the love

आरसीबी विजयोत्सव चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्यां विरोधात राज्यपालांकडे तक्रार

बंगळुरू / महान कार्य वृत्तसेवा

बंगळुरू येथे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यादरम्यान शनिवारी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्याविरोधात कथित निष्काळजीपणा केल्याबद्दल एक औपचारिक तक्रार देण्यात आली आहे. 4 जून रोजी झालेल्या या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृ्‌‍त्यू आणि अनेक जण जखमी झाले आहेत, यानंतर भारतीय जनता पक्षाने देखील राज्यातील काँग्रेस सरकारविरोधात तीव भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे.

बंगळुरू येथील कोट्टीगेपाल्यमध्ये राहणाऱ्या गिरीश कुमार यांनी राज्यापालांना ही तक्रार दिली आहे. या तक्रारीत मुख्यमंर्त्यांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे की नाही याची खतरजमा न करता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल विजयाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी वैयक्तिकरित्या लोकांना बोलावले असे म्हटले आहे.

तसेच या तक्रारीमध्ये राज्य सरकारने घेतलेल्या आरसीबी सारख्या एका खाजगी क्रिकेट फ्रँचायझीसाठी भव्य स्वरुपात स्वागत समारंभ आयोजित करण्याच्या निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की देशाच्या अभिमानापेक्षा आयपीएल हे एक नफ्याच्या हेतूने चालवला जाणारे व्यावसायिक उपक्रम आहे.

तक्रारीत काय म्हटलंय?

आयपीएल हा राष्ट्रीय अभिमानापेक्षा नफ्याच्या हेतूने चालवला जाणारा व्यावसायिक उपक्रम आहे. ”खेळाडू फ्रेंचायझीं विकत घेतात आणि ते पैशांसाठी खेळतात, देशासाठी किंवा राज्यासाठी नाही,” असा आरोप तक्रारकर्त्याने त्याच्या पत्रात केला आहे. तसेच अशा प्रकारचे विजयोत्सव सैनिक किंवा ऑलिम्पिक खेळाडूंसारख्या राष्ट्रीय हिरोंसाठी केले जात नाहीत, असेही तक्रारी नमूद केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार आरसीबी संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहचल्यावरून देखील तक्रारीत टीका करण्यात आली आहे. तसेच त्यांनी सरकार नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले असा आरोपही तक्रारीत केला आहे. याबरोबरच जे गैरव्यवस्थापनासाठी जबाबदार आहेत त्यांना शिक्षा मिळावी अशी मागणीही यामध्ये केली आहे.

आरसीबी संघाने पहिल्यांदा आयपीएल जिंकल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले असताना 4 जून रोजी संध्याकाळी बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमसमोर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर असंख्य जण जखमी झाले. दरम्यान या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मायकल कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या घटनेसाठी जबाबदार घटकांसाठी जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यास सांगण्यात आले आहे.