राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कामाच्या दिरंगाईने घेतला दुसरा बळी
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर – गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग १६६ – जी वर आज सकाळी साडेदहाच्या च्या सुमारास फुलेवाडी येथे भाडेतत्त्वावर राहणारे दत्ता रामचंद्र दिवटे (वय ८५ वर्षे, रा. फुलेवाडी ६ वा बस स्टॉप) हे पाण्याच्या टँकरखाली सापडल्याने जागीच ठार झाले.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मयत दिवटे हे आपल्या नातवंडासोबत फुलेवाडी येथे राहत होते ते टेलर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. आज सकाळी ते फेरफटका मारण्यासाठी घरातून बाहेर पडले. ते गगनबावडा महामार्गावरून कोल्हापूर च्या दिशेने पायी चालत जात असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत असणाऱ्या एम.एस.व्ही.पी सेठी कन्स्ट्रक्शन, जालना या कंपनीचा पाण्याने भरलेला टँकर रिव्हर्स मध्ये रस्त्यावर पाणी मारत गगनबावडा कडून कोल्हापूर च्या दिशेने येताना दिवटे हे फुलेवाडी जकात नाका नजिक असलेल्या माऊली ज्यूस सेंटर समोर आले असता. रिव्हर्स मध्ये मागून येणाऱ्या पाण्याच्या भरलेल्या टँकर ने त्यांना धक्का दिला, त्यांच्या पोटावरून टँकर चे मागील चाक गेल्याने ते जागीच ठार झाले.
या प्रसंगाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टँकर चालक सिरताज सिंग (वय ६१ रा.उत्तरप्रदेश) याला चौकशीसाठी ताब्यात घेवून माहिती विचारली असता, मी टँकर मागे घेत असताना बाजू सांगण्याठी टँकर च्या मागे किन्नर जोति प्रकाश राय (वय ३५, रा. उत्तरप्रदेश) याला मागे उभे केले असल्याचे सांगितले. पण त्याने मला मागे कोणीतरी असल्याची कल्पना दिली नसल्याने नकळत पणे हा अपघात झाल्याचे पोलिसांना सांगितले. घटनेचा अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.
अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग
खांडसरी फाटा ते फुलेवाडी भगवा चौक गगनबावडा महामार्गावर सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, २ महिन्यांपूर्वी याच मार्गावर प्राधिकरणाच्याचं वाहनाने एका महिलेला जागीच ठार केले होते. २ महिन्याच्या कालावधीत प्राधिकरणाच्या दिरंगाईचा हा दुसरा बळी ठरला आहे, त्यामुळे अजून किती जणांचा जीव घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.
