Spread the love

बुलढाणा / महान कार्य वृत्तसेवा

जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील तीन टर्म सलग काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे निष्ठावंत आणि ज्येष्ठ माजी आमदार दिलीप सानंदा हे अखेर 12 जून रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी खामगावमध्ये सुरू करण्यात आली आहे. जवळपास 25 हजार छर्त्या, 25 हजार घडाळी आणि 25 हजार फोटो अशी दिमाखदार तयारी करण्यात आलीय. या पक्षप्रवेशाच्या वेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार असल्याचंही बोललं जातंय.

काँग्रेसला मोठी गळती : काही दिवसांपासून दिलीप सानंदा हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. तरी देखील ”जप तक जिंदा हू काँग्रेस का परिंदा हु”, असं म्हणत ते वेट अँड वॉचची भूमिका घेत होते. मात्र आता त्यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे जेव्हापासून बुलढाण्यातीलच हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाला लागले. किंबहुना त्यांना काँग्रेस पक्षांकडून जबाबदारी देण्यात आली, त्यावेळेपासून काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. जिल्ह्यापासूनच या गळतीला सुरुवात झालीय. त्यामुळे त्यांच्यासमोरदेखील एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सानंदा यांचा राज्यातील मतदारसंघात दबाव : 1999, 2004 आणि 2009 असं सलग तीनदा काँग्रेस सत्तेत असताना माजी आमदार दिलीप सानंदा यांचा राज्यातील मतदारसंघात दबाव होता. एक आक्रमक आणि काँग्रेस पक्षाकरिता सतत झटणारे नेते म्हणून त्यांची पक्षात ओळख होती. यासोबत त्यांचं इतर पक्षांमध्येदेखील चांगले स्नेहसंबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता तेव्हादेखील माजी आमदार दिलीप सानंदा यांची गुप्त भेट चर्चेला ठरली होती. दिलीप सानंदा हे काँग्रेसमध्ये नाराज : गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या कार्यक्रमाकरिता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले असता तेथेही सार्वजनिक व्यासपीठावर ते एकाच ठिकाणी बसलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील काँग्रेसचे निष्ठावंत बाजार समिती सदस्यांनीदेखील मुंबईत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. त्यावेळेस देखील तिथे माजी आमदार दिलीप सानंदा उपस्थित होते आणि तेव्हापासूनच दिलीप सानंदा हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं दिसून आलं. मुख्य म्हणजे ज्या खामगाव मतदारसंघात दिलीप आनंदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, तिथे भाजपाची तगडी ताकद आहे आणि काँग्रेस विरुद्ध भाजपा असे समीकरण आजपर्यंत मतदारसंघानं पाहिलंय. तसेच सानंदाविरुद्ध फुंडकर परिवारानं मतदारसंघात वेळोवेळी केलेला संघर्षसुद्धा पाहायला मिळालाय. त्यामुळे आता या सत्याच्या वाट्यात सानंदा सहभागी झाल्यानंतर खामगावतूनच सध्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री असलेले आकाश फुंडकर हे कसे एकामेकांशी जुळवून घेतात हेदेखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.