Spread the love

“पाव्हणं तुम्ही म्हणाल तसं” लावणी महोत्सवात महिलांचा जल्लोष

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

साहेबजी प्रतिष्ठान, रवी रजपूते सोशल फाउंडेशन आणि हरिप्रिया महिला मंडळी इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आयोजित “पाव्हणं तुम्ही म्हणाल तसं” या लावणी महोत्सवाला घोरपडे नाट्यगृहात महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून आयुक्त पल्लवी पाटील, शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली डोंगरे, युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे तसेच प्रसिद्ध ‘होम मिनिस्टर’ निवेदिका मोनिका जाजू, हरिप्रिया मंडळाच्या अरुणा माने, प्रतीक्षा जाधव, संगीता कांबळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात प्राची मुंबईकर, किरण पुणेकर, संगीता लाखे, नमिता पाटील, अर्चना जावळेकर यां लावणी सम्राज्ञी नृत्यांगनांनी हिंदी, मराठी आणि रिमिक्स गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करत महिलांचे मन जिंकले. “तुझी चाल शिगी शिगी”, “चंद्रा”, “छत्तीस नखरे वाली”, “बुगडी माझी शोधाया”, “तुझ्या उसाला लागलं कोल्हा”, “या वाहिनी बसा वाहिनी” अशा गाजलेल्या गाण्यांवर महिलांनी नृत्याचा आनंद घेतला. तर सागर बेंद्रे, स्वाती शिंदे, स्वप्नील पाटील यां गायकांनी “मला आमदार झाल्यासारखं वाटतंय”, ” ऐका दाजीबा”, “पाटलांचा बैल गाडा” या सुपरहिट गाणे नाट्यग खिळवून ठेवले.

प्रेक्षक महिलांनी टाळ्यांचा कडकडाट, रुमाल उधळून आणि शिट्ट्यांनी नाट्यगृह दणाणून टाकले. काही महिला नृत्यांगनांसोबत ठेका धरून उत्सवात सहभागी झाल्या. बालचिमुकलीपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.

माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते, सुषमा रजपुते यांच्या पुढाकारातून दरवर्षी महिलांसाठी अशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या महोत्सवातही महिलांनी भरभरून सहभाग नोंदवून या सांस्कृतिक उत्सवाला विशेष स्वरूप प्राप्त करून दिले. कार्यक्रमासाठी रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.