सासरच्या जाचाबाबत मुरगूड पोलिसात फिर्याद दाखल
मुरगूड / महान कार्य वृत्तसेवा
चिमगाव ता. कागल येथील विवाहिता सौ शुभांगी विश्वास लोंढे (वय ४३) हिने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली. या बाबतची फिर्याद मुरगूड पोलिसात नोंदवली गेली आहे.
याबाबतची मुरगूड पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चिमगाव ता.कागल येथील सौ शुभांगी विश्वास लोंढे यांचे मृतदेह चिमगाव येथील भटकी नावाच्या शेतातील विहिरीमध्ये दि.३१ मे रोजी सकाळी नऊच्या दरम्यान आढळून आला. त्या घरातून निघून गेल्या होत्या.
म्हाळुंगे ता.करवीर येथील शुभांगी पाटील हिचा २३ वर्षांपूर्वी चिमगाव येथील विश्वास धोंडीराम लोंढे यांच्याशी विवाह झाला होता. २००५ साली सौ शुभांगी यांचा मुलगा हर्षद हा म्हाळुंगे येथे आजोळी गेला असता कॉटवरून पडला होता. आणि त्याच्या डोक्यामध्ये गाठ झाली होती. त्यावेळेपासून तो आजारीच होता. त्याच्या उपचारासाठी विश्वास लोंढे यांना स्वतःची शेती विकावी लागली होती. त्यावेळेपासून मयत शुभांगी यांना मुलाच्या उपचारासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा पती विश्वास लोंढे, सासरे धोंडीराम लोंढे व सासू शांताबाई लोंढे यांनी लावला होता.
पैशाच्या मागणी कारणावरून सौ शुभांगी यांचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. त्यातून ही दुर्घटना घडली आहे. दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशा प्रकारची फिर्याद अनिल मारुती पाटील म्हाळुंगे ता.करवीर यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला असून, त्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे हे करीत आहेत.
