आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते झाला सन्मान
कसबा वाळवा / महान कार्य वृत्तसेवा
शारदानगर, बारामती येथे भरवण्यात आलेल्या ‘माझी शाळा, माझा फळा’ या उपक्रमांतर्गत चौथ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात ‘सोहळा अक्षरांचा, सन्मान कलाकारांचा’ या विशेष कार्यक्रमात राधानगरी तालु क्यातील कसबा वाळवे गावच्या अर्नवी प्रविण मुधाळे व प्रन्वी प्रविण मुधाळे या गुणी बहिणींना ‘अक्षर गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
राज्यभरात आपल्या अंगी असलेल्या अक्षरकलेच्या अद्वितीय सादरीकरणामुळे विशेष ओळख निर्माण करणाऱ्या या उदयोन्मुख कलाकारांचा गौरव करतांना, संमेलनात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची मनःपूर्वक दखल घेतली.
कार्यक्रमास अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मा. श्री.ज्ञानेश पाटमासे (गृह विभाग, मंत्रालय), ओंकार पाटील (माजी न्यायाधीश) तसेच संमेलनाचे संयोजक अमित भोरकडे, प्रशांत वाघमारे आणि ज्ञानेश्वर विजागत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यासाठी त्यांना त्यांचे वडील प्रवीण मुधाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.
या संमेलनात राज्यभरातील अक्षरकलेतील नवनवीन प्रतिभांना व्यासपीठ मिळाले असून, हा उपक्रम अक्षरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस प्रेरणा देणारा ठरला.
