Spread the love

एकनाथ शिंदे यांचे आव्हाडांना अप्रत्यक्ष आव्हान

ठाणे / महान कार्य वृत्तसेवा

जसा ठाणे हा बाले किल्ला आहे. तसाच आता काळव्याचा देखील बालेकिल्ला झालेला आहे. येथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कळवा-मुंबा विधानसभा मतदारसंघ आहे. कळवा, मुंबा येथे राष्ट्रवादीची ताकद होती. महापालिका निवडणूकीत या भागातून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून येत होते. काही दिवसांपूर्वीच आव्हाड यांच्या अतिशय निकटवर्तीय असलेल्या कळवा शहरातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कळव्यात आव्हाडांना मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमा निमित्ताने कळवा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी कळवा हा बालेकिल्ला झाल्याचा उल्लेख केला. या संपूर्ण भागाचा विकास करायचा आहे. धोकादायक इमारती,अनधिकृत इमारतीतील प्रत्येकाला हक्काच घर पाहिजे. महापालिका किंवा राज्य शासनाच्या स्तरावरील प्रश्न हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सोडवणार असा दावा शिंदे यांनी केला. विकासाला कुठेही निधी कमी पडणार नाही ही खात्री मी देतो असेही ते म्हणाले. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळेस विकास आणि लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजना आणल्या. कोणी किती काही म्हटले तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला.