पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुण्यात भावे हायस्कूलजवळ काल (31 मे) सायंकाळी भीषण अपघात झाला. भर धाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची आज (1 जून) परीक्षा आहे. अपघातात चारजणांचे पाय मोडले तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मद्यप्रशान करून तो गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका भरधाव वेगात आलेल्या कारने 12 जणांना उडवलं होतं. या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट झालं आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 125 (अ), 125(ब), 281 अन्वये आणि मोटार वेहिकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल झालेल्या अपघातात 9 जण जखमी झाले होते तर यातील 2 जणं हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते. सदर अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या अपघातामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत बह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलनाझ सिराज अहमद जखमी झाले.
