Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल (आयसीसी) क्रिकेटच्या खेळाला आणखी रोमांचक बनवण्यासाठी नवे नियम लागू करणार आहे. हे नियम जून 2025 पासून लागू होणार आहेत. मर्यादित ओव्हर आणि टेस्ट क्रिकेटमध्ये हे नियम लागू केले जाणार आहेत, ज्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये समसमान सामना पाहायला मिळेल. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार वनडेमध्ये जुना बॉल, कनकशन सबस्टिट्युट, डीआरएस आणि बाऊंड्री लाईनवरच्या कॅचचे नियम बदलले जाणार आहेत.

वनडेमध्ये होणार बॉलरचा फायदा

आयसीसीचा मुख्य उद्देश क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलमध्ये संतुलन ठेवणं हा आहे. मागच्या काही काळात वनडे आणि टी-20 मध्ये बॅटिंगचा दबदबा पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे बॉलरना अडचणीचा सामना करावा लागला आहे, पण आता वनडे क्रिकेटमध्ये लागू असलेल्या दोन नव्या बॉलच्या नियमांना हटवण्याची आयसीसीची योजना आहे. सध्याच्या नियमानुसार वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नवे बॉल वापरले जातात, ज्यामुळे बॉल रिव्हर्स स्विंग होत नाही. पण आता जून 2025 पासून नवे नियम लागू केले जाणार आहेत. 34 ओव्हरपर्यंत दोन नवे बॉल वापरले जातील, तर 35 ते 50 ओव्हरपर्यंत फक्त एकच बॉल वापरला जाईल.

फिल्डिंग टीम 35 ते 50 ओव्हरसाठी दोन पैकी कोणता बॉल वापरायचा याची निवड करतील. पाऊस किंवा दुसऱ्या कारणामुळे मॅच 25 ओव्हरपेक्षा कमी झाली तर दोन्ही इनिंगमध्ये एक-एक बॉलचाच वापर होईल. वनडे क्रिकेटमध्ये हे नवे नियम 2 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातल्या वनडे सीरिजपासून लागू होतील.

कनकशन सबस्टिट्युटचा नियमही बदलणार

कनकशन सबस्टिट्युटचा नियमही मागच्या काही काळापासून वादात सापडला आहे. आता प्रत्येक टीमला मॅच सुरू व्हायच्या आधी मॅच रेफ्रीला पाच कनकशन रिप्लेसमेंटची नाव सांगावी लागणार आहेत. या पाच खेळाडूंमध्ये एक विकेट कीपर, एक बॅटर, एक फास्ट बॉलर, एक स्पिनर आणि एक ऑलराऊंडर असेल.

याशिवाय बाऊंड्री लाईन कॅच आणि डीआरएस प्रोटोकॉलच्या नियमांमध्येही बदल करण्यात येतील, पण त्याबाबत आयसीसी नंतर माहिती देणार आहे. टेस्ट क्रिकेटमधील नवे नियम वर्ल्‌‍ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर लागू होणार आहेत.