मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी आता मदतीच्या आशेने सरकारकडे पाहत आहेत. त्यातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुका दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना त्यांनी ”ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आता माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे वक्तव्य करून टीकेला आमंत्रण दिल्याचे दिसत आहे.
’कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे’, असे विधान माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले. अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 17 पिकांसाठी सुमारे दीडपट हमीभाव जाहीर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत. अजित पवार यांनी मला हे कृषी खाते जाणीवपूर्वक दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन, शेती आधारित व्यवसायात करिअर करावे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ”हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ”मी असं काही बोललोच नाही,” असं स्पष्टीकरण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, ”राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरणी पूर्ण झाली आहे. फळबागांचे नुकसान झाले असल्याने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही भागांत कांद्याची लागवड झाल्यामुळे कांद्याचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीमध्ये उत्पादन कमी आहे. जेवढं नुकसान झालं आहे, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. काही शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी केली आहे. हे नैसर्गिकच आहे. सध्या सोयाबीन आणि कापसाचं फारसं पीक उरलेलं नाही. मात्र, उभ्या असलेल्या फळबागा महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचे पंचनामे करणं गरजेचं आहे,” असंही कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे.
