मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुंबई आणि पुणे या दोन शहरातील अंतर आणखी कमी करण्यासाठी एक नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळं वाहतूक कोंडी तर फुटणार आहेच पण त्याचबरोबर प्रवाशांच्या वेळेची बचतदेखील होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे असे सांगितले. तसेच हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल.
तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग 6 ऐवजी 10 मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असून विक एन्डला फिरायला जाणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 14, 900 कोटी रुपये या कामासाठी लागणार असून चार ठिकाणी नव्याने बोगदे तयार करावे लागणार आहेत.
मान्सून काळात या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनाही घडतात. म्हणूनच सरकारने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे. खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने दोन महाकाय बोगदे उभारण्यात येत आहेत. या दोन्ही बोगद्यांची कामे 98 टक्क्यांपर्यंत झाले आहे. तर, बोगद्यातील अंतर्गंत कामे सुरू आहेत. मिसिंग लिंकमुळं मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. तसंच, वाहतुक कोंडी व प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. तसंच, आपत्कालीन एक्झिटसाठी 300 मीटरच्या अंतरावर बाहेर पडण्याचा मार्ग आहे. याशिवाय दरड कोसळू नये म्हणून ठिकठिकाणी रॉक बोल्ट लावण्यात आले आहेत.
