पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
मागील दोन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे. सोमवारी रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. मे महिन्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. ”यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाला आहे. त्यामुळं मुंबईसह राज्यातील इतर भागात अशाच पद्धतीनं पुढील चार दिवस पाऊस होणार आहे. तब्बल 35 वर्षानंतर मान्सून मे महिन्यात राज्यात दाखल झाला आहे,” अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिली.
35 वर्षांनी मान्सून मे महिन्यात दाखल : सोमवारी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईत जनजीवन विस्कळीत झालं. याबाबत हवामान विभागाचे तज्ज्ञ एस .डी. सानप म्हणाले, ”मुंबईसह राज्यातील इतर भागात मान्सून दाखल झाला आहे. यंदा राज्यात लवकरच मान्सून दाखल झाला असून 1990 नंतर तब्बल 35 वर्षांनी मान्सून मे महिन्यात दाखल झाला आहे.
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता : सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, याबाबत हवामान तज्ज्ञ सानप म्हणाले, ”येणाऱ्या 4 ते 5 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच घाट माथ्यावर देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. बारामतीमध्ये तब्बल 133 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.”
मुंबईत ढगाळ वातावरण : एकीकडं पावसानं मुंबईसह उपनगरात रविवारी आणि सोमवारी जोरदार बॅटिंग केल्यानंतर दुसरीकडं मंगळवारी सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण असून, रिमझिम पाऊस सुरू आहे. तर, रेल्वे आणि रस्ते वाहतूकदेखील व्यवस्थित सुरू आहे. सोमवारी मुंबईतील भूमिगत एक्वा मेट्रो लाईनमध्ये पाणी शिरलं होतं. त्यामुळं वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलं होतं. परंतु, मंगळवारी पुन्हा एकदा मुंबई भूमिगत एक्वा मेट्रो लाईन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला नुकसानीचा आढावा : ”बारामती इंदापूर आणि पुरंदर तालुक्यात मागील सात दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. सुरुवातीला हवा हवासा वाटणारा पाऊस आता लोकांना नकोसा झाला आहे. ‘अरे बाबा बस झालं..आता थांब’ असं म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यात तर, काही ठिकाणी वार्षिक सरासरी इतका पाऊस पडलाय,” असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी बारामती शहरामध्ये पावसामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
