Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 वर्षांची कारकीर्द इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सांगितले. मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. गुजराती भाषेत बोलताना शाह म्हणाले की, ज्यांना ”एक चुटकी सिंदूर”ची किंमत माहीत नव्हती, त्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे याची माहिती देण्यात आली.

परदेशात भारतीय पासपोर्टचे मूल्य वाढवले ​​: ”मोदींनी पंतप्रधान म्हणून 11 वर्षे पूर्ण केली आहेत. गुजरातचा सुपुत्र देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवण्यात आला आहे,” असंही अमित शाह यांनी अधोरेखित केलंय. पंतप्रधान मोदींनी लोकांना भारतीय असल्याचा अभिमान वाटून दिला आहे आणि परदेशात भारतीय पासपोर्टचे मूल्य वाढवले ​​आहे, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

प्रबळ राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदींच्या कार्यकाळात अयोध्येतील राम मंदिर आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधण्यात आले. खरं तर हे प्रबळ राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य झालंय. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराचे संचालन करण्यासाठी विश्वस्तांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केलंय. संस्थेत समाजसेवेची भावना आहे, ज्यामुळे ते सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र बनले आहे, असे केंद्रीय गृहमंर्त्यांनी सांगितलंय.