कोट्यवधींच्या कार असूनही क्रिकेटपटूची आवडती कार कोणती माहितीय?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
पहिली कार… मुळात जीवनात कोणतीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदाच खरेदी केली जाते तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्वं जरा जास्तच असतं. किंबहुना महत्त्वापेक्षाही त्या गोष्टीशी भावनिक नातं तुलनेनं अधिक घट्ट असतं. अगदी विराट कोहलीसुद्धा इथं अपवाद नाही. कारण, जीवनातील अशाच एका खास गोष्टीबाबत सांगताना तो क्षणात भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
नुकतंच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विराट आता त्याच्या वैयक्तिक जीवनात रमताना दिसत आहे. तो काही कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसत आहे. अशाच एका कार्यक्रमामध्ये विराटनं त्याच्या मनाच्या जवळ असणारी एक सुरेख बाब उलगडून दाखवली आणि बोलताना नकळत त्याला आवाज खोल गेला.
पहिली कार आणि विराट…
विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक असून, या खेळाडूकडे कोट्यवधींच्या कार आहेत. किंबहुना हवी ती कार विराट अगदी हवं तेव्हा खरेदी करु शकतो असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. पण, तरीही पहिली कार त्याच्यासाठी आजही तितकीच खास आहे. खुद्द विराटनं एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा करत आपण 2008 मध्ये पहिली कार खरेदी केल्याचं सांगितलं.
‘पहिली कार…’ असं म्हणताना त्यानं क्षणभर अवंढा गिळला आणि चेहऱ्यावर सुरेख स्मित आणत तो म्हणाला, ‘2008 मध्ये मी पहिली कार खरेदी केली होती. टाटा सफारी. मला मोठ्या गाड्या आवडायच्या आणि तेव्हा कारमध्ये म्युझिक सिस्टीम लावण्याचा ट्रेंड होता. तर, मग मीसुद्धा कारमध्ये म्युझिक सिस्टीम लावून घेतली होती’. टाटाची ही कार फक्त विराटच नव्हे, तर भारतात अनेक कारप्रेमींच्या आवडीची. पण, आपण ती का खरेदी केली यामागचं कारणसुद्धा विराटनं सांगितलं.
त्या काळात टाटा सफारी ही अशी कार होती, जी रस्त्यावर चालेल तेव्हा समोरून जो कोणी येईल तो बाजूला होईल… थोडक्यात या कारचा ींदर् झ्ीाोहम इतका कमाल होता की त्याच कारणानं विराटनं ती खरेदी केली होती. या कारसंदर्भातील एक आठवणही त्यानं सांगितली. एकदा जेव्हा विराट त्याच्या भावासोबत टाटा सफारीनं प्रवास करत होता तेव्हा पेट्रोल पंपावर गेलं असता या भावंडांनी चुकून कारमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल भरून घेतलं होतं. ही अशी गल्लत बरीच मंडळी एकदातरी करतात, हेच विराटचा हा अनुभव पाहून लक्षात आलं.
राहिला मुद्दा या कारच्या लोकप्रियतेचा तर, या कारचे 32 व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध असून, सहा रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे. टाटा सफारी एक्स शोरूम किंमत 15.50 लाख रुपये असून, क्रॅश टेस्टमध्ये कारच्या सुरक्षिततेला 5 स्टार रेटिंग मिळाल्यानं इथं टाटांची विश्वासार्हतासुद्धा जिंकली आहे असं म्हणायला हरकत नाही.
