आता फक्त तीन देश पुढे ; प्रत्येकासाठी अभिमानाची बाब!
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारताने पुन्हा एकदा आर्थिक आघाडीवर झेंडा फडकवलाय. भारताने आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय. याचा अर्थ आता भारतापेक्षा फक्त तीन देश पुढे आहेत.
नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुबह्मण्यम यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय. आयएमएफच्या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी आता 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेलाय.
नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काऊन्सिल बैठकीनंतर आर. सुबह्मण्यम यांनी पत्रकारांशी संवाद साधत अत्यंत महत्वाच्या विषयावर भाष्य केले. ‘सध्या जागतिक राजकीय आणि आर्थिक वातावरण भारताच्या बाजूने आहे. सध्या, मी बोलत असताना भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय’, असे त्यांनी सांगितले. आज भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाल्याचे आयएमएफने म्हटलंय.
आता फक्त तीन देश भारताच्या पुढे
आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही यावेळी नीती आयोगाचे सीईओ आर. सुबह्मण्यम म्हणाले.
ट्रम्प यांची धमकी, सुबह्मण्यम यांचे उत्तर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतात आयफोनच्या निर्मितीवर नाराजी व्यक्त केली आणि ट्रुथ सोशलवर एक पोस्ट लिहून ही धमकी दिली. ट्रम्प यांनी लिहिलेल्या पोस्टनुसार, ‘मी यापूर्वी ॲपलच्या टिम कुकलाही हे समजावून सांगितले होते. अमेरिकेत विकला जाणारा आयफोनदेखील अमेरिकेतच बनवला जाईल, भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नाही. जर असे झाले नाही तर ॲपलला अमेरिकेत किमान 25 टक्के टॅरिफ भरावा लागेल.’ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलला दिलेल्या धमकीबद्दल सुबह्मण्यम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शुल्क काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता भारत हेच उत्पादनासाठी परवडणारे ठिकाण राहील. मालमत्ता मुद्रीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे आणि ते ऑगस्टमध्ये सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
