सातारा / महान कार्य वृत्तसेवा
गुन्हे करूनही राज्यातील अनेक गुंड तुरुंगाच्या बाहेर आहेत. साताऱ्यात सत्तेच्या जोरावर विनाकारण काही लोकांना त्रास दिला जात आहे. पीडित महिलेला खंडणी प्रकरणात अडकवून काही त्रास दिला. त्याचं सत्य लवकरच समोर येईल, असा सूचक इशारा आमदार रोहित पवारांनी मंत्री जयकुमार गोरेंना दिला. साताऱ्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी सोमवारी बोलत होते.
कॅबिनेट मंर्त्याकडून दहशतीचं राजकारण- राज्यात बीडसह समोर येत असलेल्या अनेक ठिकाणच्या घटनांचा दाखला देत आमदार रोहित पवार म्हणाले की, अनेक गुन्हे करणारे गुंड तुरुंगाच्या बाहेर आहेत. सत्तेच्या जोरावर साताऱ्यातील काही जणांना विनाकारण त्रास दिला जात आहे. कॅबिनेट दर्जाच्या मंर्त्यानं राज्याच्या प्रश्नात लक्ष घालायला पाहिजे. मात्र, जिल्ह्यात बसून, शासकीय यंत्रणेला हाताशी धरून ते कुरबुरीचे आणि दहशतीचे राजकारण करत आहेत. अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही ठामपणे बोलतच राहणार आहोत.
पोलिसांनी घरगड्यासारखे काम करू नये – दिवस सारखे राहत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी घरगड्यासारखे काम करू नये, असा इशारा आमदार रोहित पवारांनी दिला. ते पुढं म्हणाले की, पोलिसांनी वर्दीत राहून दुसऱ्याला धार्जिणे काम करणं योग्य नाही. हा चुकीचा प्रकार सुरू आहे. खंडणी प्रकरणात साताऱ्यातील पीडितेवर पोलिसांकडून दबाव आणला जात आहे. दबाव आणणाऱ्यांनी मंत्रिपदाचा उपयोग विकासासाठी करावा. त्यांनी पोलिसांना घेऊन दडपशाही करू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच- दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबद्दल बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांच्यात संवाद होत नाही, तोपर्यंत एकत्रिकरणाची चर्चाच राहील. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होतील, अशी चर्चा असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.
