मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
भारतामधून अमेरिकेला पाठविलेला जवळपास 4 कोटी 28 लाख किंमतीचा आंबा तेथील विमानतळावरील त्रुटींमुळे स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे. अमेरिकेली यंत्रणांनी नकार दिल्याने हा सर्व नाशवंत माल तिथेच नष्ट करावा लागला असून, निर्यातदारांना नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात फळमालाचं नुकसान झाल्याने परदेशात आंबा निर्यात करण्याची प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे.
नवी मुंबईत विशेष केंद्र
अमेरिकेला आंबा निर्यात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकीरण केंद्र सुरू केले आहे. येथे अमेरिकन अधिका-यांच्या उपस्थितीमध्ये आंब्यावर विकीरण प्रक्रिया केली जाते. याच माध्यमातून हा आंबा पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
…म्हणून स्वीकारला नाही आंबा
मे महिन्यात लॉस एंजिलिस, सॅन फ्रान्सिस्को व अटलांटा विमानतळावर जवळपास 4 कोटी 28 लाख रुपयांचे आंबे तेथील प्रशासनाने स्वीकारण्यास नकार दिला. अमेरिकेत आंबा पाठवताना विकीरण प्रक्रिया केल्यानंतर आवश्यक पीपीक्यू 203 अर्जावर सह्या केल्या जातात. मात्र भारतात गेलेल्या आंब्यासंदर्भात याच कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे हा आंबा स्वीकारण्यास तेथील स्थानिक यंत्रणांनी नकार दिला.
आंबा परत आणणं शक्य नव्हतं
अमेरिकेने नाकारलेला आंबा परत भारतामध्ये आणणेही खर्चिक असल्यामुळे तो सारा माल तेथेच नष्ट करावा लागला. त्यामुळे निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नक्की कोणाच्या चुकीमुळे हे घडले हे तपासण्याची मागणी केली जात आहे.
पणन मंडळाकडून चौकशी सुरू
सदर प्रकरणासंदर्भातील अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल तसेच अमेरिकेतील आंबा निर्यात थांबली नसून, ती सुरू असल्याची माहिती, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे. दरवर्षी अमेरिकेमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात केली जाते. मात्र कोणताही कृषीमाल अमेरिकेत पाठवताना तेथील नियम आणि अटींची पूर्तता करणाऱ्या मालालाच परवानगी दिली जाते. यासाठी काही प्रमाणपत्रं आणि चाचण्या अनिवार्य असून यामध्ये कसूर आढळल्यास शेतमाल नष्ट केला जातो. असाच काहीसा प्रकार भारतात अमेरिकेत पाठवण्यात आलेल्या आंब्यांसंदर्भात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणाच्या अहवालामध्ये नेमकी काय माहिती समोर येते? दोषींवर काय कारवाई होते? नेमकी चूक कुठे झाली? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
