पर्यायी वाहतूक सुविधेचा परिणाम ; आता उरला केवळ एकच टांगा
इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा (सागर बाणदार)
यंञमाग उद्योग व त्याच्याशी निगडीत उद्योग,व्यवसायामुळे प्रत्येक हाताला रोजगार देणा-या कष्टकऱ्यांच्या नगरीतील इचलकरंजी शहरात सर्वसामान्यांसाठी दळणवळणाची हक्काची सुविधा देणा-या टांगा (घोडागाडी) व्यवसायाला विविध कारणांमुळे अखेरची घरघर लागली असून तो कायमचा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शहरात एकेकाळी ७० टांगे होते.त्यापैकी आता केवळ एकच टांगा उरल्याने टांगा व्यवसायाचे भवितव्यच अधांतरी झाले आहे.
यंञमाग उद्योगासह इतर उद्योग – व्यवसायाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात कामगार वर्गाची संख्या वाढली तशी शहराची हद्द देखील वाढत जाऊन ती कोरोची ,तारदाळ , कबनूर ,यड्रावपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वर्गाला मध्यवर्ती एसटी स्टँडवरुन कोरोची , डेक्कन मिलपर्यंत जाण्यासाठी किंवा एसटी स्टँडवर येण्यासाठी टांगा ( घोडागाडी )हा अगदी आर्थिकदृष्ट्या परवडणारा खात्रीचा पर्याय होता.त्यामुळेच शहरात साधारण ६० वर्षांपासून टांग्याची संख्या ७० पर्यंत वाढत गेली.त्यात प्रवाशांना ने -आण करण्यासाठी आकारण्यात येणारे भाडेही अत्यंत कमी होते.याचा परिणाम टांग्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. १९८८ साली टांग्यासाठी प्रत्येक प्रवाशाला एसटी स्टँडवरुन डेक्कन मिलपर्यंत ८ आणे आणि कोरोची गावापर्यंत १ रुपये भाडे सोडण्यासाठी किंवा एसटी स्टँडपर्यंत आणण्यासाठी आकारले जात होते.यात ब-याचदा एसटी स्टँडवरुन कबनूरपर्यंत देखील प्रवाशांना सोडले जात होते.
पण कालांतराने ,रिक्षा आणि खासगी वाहनांची संख्या वाढली. तसेच प्रवाशांना वेळेत ये – जा करण्यासाठी एसटी ,रिक्षा ,वडाप व खासगी वाहनांचा पर्याय निवडणे भाग पडले.विशेष म्हणजे टांगा व्यवसायात कोणतीच सुरक्षितता आणि आर्थिक कमाईची शाश्वती नसल्याने नव्याने येणाऱ्यांची संख्या कमी होत गेली.याशिवाय आर्थिक कमाईच्या मानाने घोड्याचा चारापाणी खर्च भागवणे देखील आवाक्याबाहेर होत गेले. त्यामुळे अनेकांनी वयाच्या किंवा आरोग्याच्या तक्रारी व इतर कारणांमुळे टांगा व्यवसाय बंद केला.साहजिकच शहरातील टांग्यांची संख्या कमी झाली.
आता केवळ आप्पासो यशवंत भिसे ( वय ५३ ,रा.सहकारनगर , इचलकरंजी )यांचाच एकमेव टांगा उरला आहे. सध्या टांग्याने प्रवाशांना डेक्कन मिलपर्यंत १० रुपये आणि कोरोची गावापर्यंत २० रुपये भाडे सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी आकारले जाते.एकेकाळी सर्वसामान्य वर्गातील प्रवाशांना डेक्कन मिल ,कोरोची , कबनूर गावापर्यंत जाण्यासाठी किंवा एसटी स्टँडपर्यंत येण्यासाठी टांगा म्हणजे कमी खर्चाचा हक्काचा मानला जात होता.पण , कालांतराने धावत्या युगाबरोबर चालत राहण्यासाठी अनेकांनी प्रवासासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था स्विकारली.त्यामुळे अनेकांच्या कुटूंब उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेल्या टांगा व्यवसायाला अखेरची घरघर लागून तो गायब होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
पर्याय नाही म्हणून…
इचलकरंजी शहरात एकेकाळी टांगा व्यवसाय सर्वसामान्य वर्गातील अनेकांच्या कुटूंबाचा मोठा आधार होता.पण ,ये – जा करण्यासाठी आर्थिकदृष्टया परवडणारा. वडाप व खासगी वाहनांचा पर्याय निर्माण झाला आहे.परिणामी ,टांगा व्यवसाय कमी होत गेला.पण ,आता केवळ माझाच एकमेव टांगा उरला आहे.पर्याय नाही म्हणून मला कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय टिकवून ठेवावा लागला असून यातून दररोज ५०० ते ६०० रुपयांची आर्थिक कमाई होत असली तरी या सर्वसामान्यांना सुखरुपपणे प्रवास घडवून आणता येतो ,याचेच मनाला मोठे समाधान आहे.
– आप्पासो यशवंत भिसे, टांगा व्यावसायिक
