Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईची लाईफ लाइन समजली जाणारी लोकल ट्रेन हा विषय मुंबईत नोकरीसाठी रोज अप-डाऊन करणाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र याच मुंबई लोकलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरं तर मुंबई लोकलमध्ये होणारे वाद आणि भांडणं हा मुंबईकरांसाठी फार नवीन विषय राहिला नाही. अगदी धक्का का मारलापासून ते जागेसाठीही जोरदार भांडणं लोकल ट्रेनमध्ये होतात. मात्र सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये जनरल डब्यामध्ये पुरुषाने महिलेला मारहाण केल्याचा घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.

अंबरनाथ लोकलमधील प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटीवरुन सुटणाऱ्या अंबरनाथ लोकल ट्रेनमध्ये घडला आहे. या ट्रेनमधील जनरल डब्यात जागेच्या वादातून एका पुरुषाने चक्क महिला प्रवाशाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.  मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ही घटना नेमकी ट्रेन कुठे असताना घडली आणि किती वाजता घडली याची माहिती समोर आलेली नाही. मारहाण करणारी आणि ज्या महिलेला मारहाण केली जात आहे ती महिला कोण आहे यासंदर्भातील तपशीलही समोर आलेला नाही.

व्हिडीओमध्ये काय आहे?

जनरल डब्ब्यामध्ये एक पुरुष प्रवाशी एका महिला प्रवाशाला मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे, मात्र अजून कोणत्याही रेल्वे स्थानकावर याबाबत तक्रार दाखल झाली नाही. विंडो सीटला बसलेल्या एका कुटुंबातील सदस्याला महिलेने शिवी दिली असा आरोप करत कुटुंबातील एक व्यक्ती तिला हातातील हॅण्ड बॅगने हाणामारी करण्यास सुरुवात करतो. नंतर ही व्यक्ती या महिलेवर धावून जाते. ”तू आईवरुन शिवी कशी दिली?” असा जाब ही व्यक्ती महिलेला विचारताना दिसत आहे. दुसरीकडे अनेक प्रवासी या व्यक्तीला महिलेवर हात उचलू नको असं सांगत मारहाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

कठोर शिक्षेची मागणी

मात्र हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाने या प्रकरणामध्ये दोषीविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करताना दिसत आहे. सामान्यपणे पुरुषांच्या डब्यामध्ये पुरुष प्रवाशांमध्ये धक्काबुक्की होणं किंवा हाणामारी होणं अशी बाब सामान्य आहे. तसेच महिलांच्या डब्ब्यामध्येही अनेकदा अगदी हाणामारीपासून ते एकमेकींचे केस ओढण्यापर्यंत भांडणं झाल्याचे व्हिडीओ यापूर्वीही समोर आले आहेत. मात्र धावत्या लोकल ट्रेनमध्ये एखाद्या पुरुषाने जनरल डब्यामध्ये महिलेला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ फारच धक्कादायक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

महिला जनरल डब्यातही सुरक्षित नाहीत का? या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्यपणे महिलांच्या डब्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहून महिलांच्या डब्यांमध्ये रात्री उशीरापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ठेवण्याचा निर्णय अनेक वर्षांपूर्वी घेण्यात आला असून त्याची अंमलजबावणीही केली. मात्र आता जनरल डब्यात असा प्रकार घडल्याने महिला आता जनरलच्या डब्ब्यातही सुरक्षित नाहीत का? असा सवाल उपस्थित केला आहे.