पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा
मे महिन्याच्या अखेरच्या सुट्ट्या जवळ येत असल्याने पन्हाळगडावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः तीन दरवाजा परिसरात पर्यटकांच्या वाहनांची तुफान गर्दी झाली असून, अधिकृत पार्किंग जागा तुडुंब भरल्याने अनेकांनी वाटेल त्या ठिकाणी वाहने उभी केली आहेत. परिणामी वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडावरील तीन दरवाजा, तबक उद्यान, पुसाटी बरुज, सज्जा कोठी यासह अनेक ठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटक जागा दिसेल तिथे वाहने लावतात. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन नियोजन करणे गरजेचे असताना, पार्किंग व्यवस्था अपुरी ठरत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष घालून वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पन्हाळगडावर पर्यटकांची संख्या तुलनेत कमी होती. मात्र, सुट्ट्यांचा शेवट जवळ येत असल्याने पर्यटनस्थळांमध्ये पुन्हा चैतन्य आले आहे. त्यामुळे स्थानिक गाईड, नाश्ता सेंटर, हॉटेल, लॉजिंग आदी व्यवसायांना चांगली चाल मिळत आहे.
तरीही, वाढती गर्दी आणि अव्यवस्थित पार्किंगमुळे संभाव्य अपघात, अडथळे आणि पर्यटकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने अतिरिक्त पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
