Spread the love

आरक्षण उपवर्गीकरणासाठी लाखों समाजबांधव मुंबईत धडकणार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आता रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 20 मेला मातंग समाजाच्या वतीने मंत्रालयावर महाआक्रोष मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यात लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा, यासाठी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज 20 मे रोजी लाखोंच्या संख्येने मुंबईवर महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या महाआक्रोश मोर्चाला मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मातंग समाजातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आक्रोश महाआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन 20 मे 2025 रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी 1 ला हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून 2025 पासून लागू करावे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल. हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे, अशी समाजाची मागणी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते रमेश बागवे यांनी दिली आहे.

दरम्यान, या आंदोलनात भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी देखील पुढाकार घेतला असून या मोर्चासाठी आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरु आहे.  मातंग समाजाचा उद्या मुंबईत विराट मोर्चा होतोय. मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभरातून अनेक संघटना दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने हे नियोजन करण्यात येत आहे. सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अजून तीव करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. उद्या (मंगळवारी) आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी सर्व समाज बांधवाना केले आहे.

दरम्यान, या आंदोलनात सर्व पक्षीय अनेक मान्यवर नेते आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून, उपस्थिती लावणाऱ्यांमध्ये खालील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे :

विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार मधुकरराव घाटे, माजी आमदार नामदेव जयराम ससाणे,, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन साठे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, याशिवाय  पंडित सूर्यवंशी ,  मारुती वाडेकर, अशोक लोखंडे, राम चव्हाण यांसारखे अनेक नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.