खासदारांच्या शिष्टमंडळावरून मविआत मतभेद?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस खासदारांचं शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना आणि विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेटणार आहे. खासदारांचं शिष्टमंडळ ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तान विरुद्ध का आणि कशी कारवाई केली? हे स्पष्ट करणार आहे. या शिष्टमंडळावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून कोणीही स्थानिक राजकारण करू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले होते की, शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत नऊ खासदार आहेत. शरद पवार गट व एकनाथ शिंदे गटाच्या तुलनेत आमचा एक सदस्य जास्त आहे. लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे होती. यावरून स्पष्ट होते की सरकार इथेही राजकारण करत आहे. सरकारी खर्चाने हे वऱ्हाड पाठवायची तशी गरज नव्हती, हे वऱ्हाड निघाले आहे, युरोपला, आफ्रिकेला, पण ते जाऊन काय करणार आहेत? परदेशात आपले हाय कमिशन आहे, ते काम करत आहेत. मग काय गरज आहे? जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. पंतप्रधान 200 देश फिरले तरी एकही देश पाठीशी उभा राहिला नाही. म्हणून त्यांच्यावर ही नौंटकी करण्याची वेळी आली आहे. घ्ऱ्घ्अ ब्लॉकचे जे सदस्य चालले आहेत, त्यांनी या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली होती.
कोणीही स्थानिक राजकारण करू नये : शरद पवार
संजय राऊत यांच्या टीकेबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, हा पक्षावर निर्णय नसतो. जेव्हा नरसिंह राव यांचे सरकार होते, त्यावेळी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ नेमले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिष्टमंडळ नेमण्यात आले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मी देखील सदस्य होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळेस येतात, त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते. आज सरकारने शिष्टमंडळ केले, देश वाटून दिले. भारताची भूमिका काय आहे? ती सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ आहे. त्यांचे मत काय हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या पक्षाचे एक सदस्य आहेत, असं दिसतंय. मात्र कोणीही इथे स्थानिक राजकारण आणू नये, अशी आमची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
