Spread the love

रायगड / महान कार्य वृत्तसेवा

रायगडच्या कर्जत तालुक्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. भिवपुरी येथील टाटा डॅममध्ये मुंबईच्या गोवंडीचे दोन तरुण बुडाले आहेत. मुंबईवरुन उन्हाळी सुट्टी असल्यामुळे ते फिरण्यासाठी या परिसरात आले असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टाटा डॅममध्ये मुंबईच्या गोवंडीचे दोन तरुण बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इबाहिम आझीज खान वय 24, खलील अहमद शेख वय 24, रा. गोवंडी मुंबई अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, हे दोन तरुण नेमके कसे बुडले? त्यांच्याबरोबर आणकी कोणी होते का? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिस याबाबतचा तपास करत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळं अनेकजण सध्या पर्यटन करत आहेत. मात्र, पर्यटनस्थळी गेल्यावर योग्य ती काळजी न घेतल्यामुळं दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळं नागरिकांनी तरुण मुलांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. पर्यटनाच्या ठिकाणी या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होताना दिसत आहे.

गेल्या महिन्यातच रायगड जिल्ह्यात घडली होती धक्कादायक घटना दरम्यान रायगड जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. गेल्या महिन्यातच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले म्हसळा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्या दोन्ही मुलांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली होती. आपल्या बहिणीचा मुलगा नुकताच ऐरोली येथून शाळेला सुट्टी लागल्यामुळे गावी आला होता. त्याला घेऊन संतोष पाटील यांचे दोन्ही चिरंजीव हे श्रीवर्धन तालुक्यातल्या वेळास बीचवर फिरण्यासाठी गेले होते. मात्र फिरण्यासाठी गेले असता या तिघांना पोहोण्याचा मोह झाला होतो. त्यानंतर हे तिघेही खोल समुद्रात उतरले. मात्र समुद्रातल्या लाटांनी या तिघांना कधी गिळंकृत केलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही. यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये मयुरेश संतोष पाटील (वय 23 वर्षे), अवधुत संतोष पाटील (वय 26 वर्षे) या दोन सख्ख्या भावांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर हिमान्शु पाटील (वय 21 वर्षे) याचा देखील या अपघातात मृत्यू झाला. हिमान्शु नवी मुंबई मधील ऐरोलीमध्ये राहत होता. या तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक बोट चालकांनी मदत केली.