Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारताने फक्त दोन दिवसांत पाकिस्तानी सैन्याची दाणादाण उडवल्यानंतरही पाकचा तोरा अजूनही कमी झालेला नाही. पाकिस्तानमधील नेते आणि काही व्यक्ती सातत्याने भारताविरोधी गरळ ओकताना आणि फुशारक्या मारताना दिसत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी शस्त्रसंधी झाली होती. यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी सातत्याने भारताविरोधात वक्तव्ये करताना दिसत आहे. शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये विजयी यात्रा काढली होती. यावेळी शाहीद आफ्रिदीने आणखी एक हास्यास्पद वक्तव्य केले आहे. भारत हा पाकिस्तानला प्रगती करण्यापासून रोखत असल्याचे त्याने म्हटले.

भारत प्रगती करत आहे. आम्ही भारताच्या प्रगतीवर खुश आहोत. भारताचं क्रिकेटही प्रगती करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पाकिस्तानही पुढे जात आहे. पण आम्हाला रोखले जात आहे. कारण पाकिस्तान वेगाने प्रगती करत आहे. हे शेजाऱ्यांचे काम आहे का, असा सवाल शाहीद आफ्रिदीने विचारला. शाहिद आफ्रिदी याचा चुलत भाऊ शाकिब हरकत उल अंसार हा 2003 साली भारतीय सैन्यासोबत (घ्ह्‌‍ग्रह अीस्ब्) अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तो दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. बीएसएफला शाकिबकडे सापडलेल्या कागदपत्रांवरुन ही गोष्ट सिद्ध झाली होती. मात्र, शाहीद आफ्रिदीने या वृत्ताचा इन्कार केला होता.

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्धाच्या खुमखुमीने भारताला संकटात ढकलले आहे. पाकिस्तानचा सामना करणे किती महागात पडते हे पंतप्रधान मोदींना आता कळाले असेल, असे आफ्रिदीने म्हटले होते. शाहीद आफ्रिदीने सोमवारी कराची येथे विजयी रॅली काढली होती. शाहिद आफ्रिदी यापूर्वी भारत सरकार आणि सशस्त्र दलांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे, विशेषत: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळी त्याने भारतीय सैन्यावर वादग्रस्त विधान केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी त्याने भारतीय सैन्याला जबाबदार धरले होते. त्यामुळे भारतातील अनेकजण शाहीद आफ्रिदीवर प्रचंड टीकाही करतात. मात्र, या सगळ्यानंतरही शाहीद आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकणे थांबवलेले नाही.